पुणे : पुढारी वृत्तसेवा : महावितरणच्या पुणे प्रादेशिक विभागात जानेवारीत 4 कोटी 63 लाख रुपयांची वीज चोरीची 499 प्रकरणे व 1 कोटी 34 लाख रुपयांची अनधिकृत वीज वापराची 264 प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. जानेवारीत वीज चोरीविरुद्ध कडक मोहीम राबविण्यात आलेली असून, 7 हजार 567 वीज जोडण्यांची तपासणी करण्यात आलेली आहे. यात 4 कोटी 63 लाख रुपयांची एकूण 499 वीज चोरीची प्रकरणे उघडकीस आली तर 134 लाख रुपयांची 264 अनधिकृत वीज वापराची प्रकरणे उघडकीस आलेली आहे. वीज चोरीच्या 224 प्रकरणात दोन कोटी सात लाख रुपये वसूल करण्यात आले तर अनधिकृत वीज वापराच्या 71 प्रकरणात 20 लाख 56 हजार रुपये वसूल करण्यात आले.
पुणे परिमंडळात एकूण दोन हजार 770 वीज जोडण्या तपासण्यात आल्या. यात अनधिकृत वीज वापराची 212 प्रकरणे व वीज चोरीची 225 प्रकरणे उघडकीस आलेली आहे. बारामती परिमंडळात एकूण एक हजार 535 वीज जोडण्या तपासण्यात आल्यात. यात अनधिकृत वीज वापराची 11 प्रकरणे व वीज चोरीची 180 प्रकरणे उघडकीस आलेली आहे. कोल्हापूर परिमंडळात एकूण तीन हजार 262 वीज जोडण्या तपासण्यात आल्या. यात अनधिकृत वीज वापराची 41 प्रकरणे व वीज चोरीची 94 प्रकरणे उघडकीस आलेली आहे.
वीज चोरीविरुद्ध मोहीम अधिक तीव— करण्याचे निर्देश पुणे प्रादेशिक विभागाचे प्रभारी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी दिले आहेत. विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 व 136 नुसार वीजचोरी हा दंडनीय अपराध असून यात आरोपींना 3 वर्षापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. नुकतेच अहमदनगर सत्र न्यायालयाने वीज चोरीच्या प्रकरणात एका आरोपीस दोन वर्ष कैदेची शिक्षा ठोठावली आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज चोरीपासून परावृत्त व्हावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.