पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या शहर फेरीवाला समितीच्या निवडणुकीसाठी 58 टक्के मतदान झाले. पहिल्यांदाच होत असलेल्या निवडणुकीत पथारी व्यावसायिकांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि. 4) होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पथारी पुनर्वसन कायदा अस्तित्वात आला.
या कायद्यातील तरतुदीनुसार पथारी व्यावसायिकांसाठी प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फेरीवाला समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. त्यानुसार महापालिकेने 20 सदस्यांची समिती तयार केली आहे. या समितीत 8 पथारी व्यावसायिक, 8 अधिकारी आणि संघटनांचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. दरम्यान, या समितीमधील पथारी व्यावसायिकांच्या नेमणुकीसाठी पहिल्यांदाच निवडणूक घेण्यात आली. या 8 जागांसाठी एकूण 36 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यामधील अनुसूचित जमातीच्या (महिला) जागेवरील निवडणूक बिनविरोध झाली होती.
या निवडणुकीसाठी 11 हजार 909 मतदारांसाठी 15 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये 32 केंद्रांवर मतदानाची सोय करण्यात आली होती. त्यात 6 हजार 879 पथविक्रेता मतदारांनी मतदान केले. यात 4 हजार 963 पुरुष, तर 1 हजार 916 महिला मतदारांचा समावेश आहे. महापालिकेचे 480 अधिकारी व कर्मचारी या निवडणूक प्रक्रियेत होते. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी (दि. 4) सकाळी 11 वाजता घोले रोड येथील रवी वर्मा आर्ट गॅलरी येथे होणार आहे.