पुणे; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात 221 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदांसाठी 1 हजार 35 जणांनी अर्ज दाखल केले होते. नागरिकांमधून थेट सरपंच निवडला जाणार असल्याने आरक्षण आणि गावातील राजकीय गणिते बघून 463 जणांनी निवडणूकीतून माघार घेतली आहे. छाननीअंती 12 उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे आता 560 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबरला मतदान होणार आहे.
निवडणूक कार्यक्रमानुसार 731 सदस्य पदांसाठी 5 हजार 35 उमेदवारांनी 5 हजार 78 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. अर्जांची छाननी केल्यानंतर 33 उमेदवारांचे 48 अर्ज बाद झाले. त्यामुळे 5 हजार 4 वैध उमेदवारांचे 5 हजार 30 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. तसेच 1 हजार 971 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. सरपंचपदासाठी 1 हजार 35 उमेदवारांनी 1 हजार 40 उमेदवारी अर्ज दाखल केले होते. छाननीअंती 12 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाद झाले. तर 463 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे आता सरपंचपदासाठी 560 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
जिल्ह्यातील 221 ग्रामपंचायतींच्या 731 सदस्यपदांसाठी आणि 221 सरपंचपदांसाठी ही निवडणूक होत आहे. 20 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तसेच निकालाची अधिसूचना 23 डिसेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे. जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील 28 ग्रामपंचायती, भोरमधील 54, दौंड 8, बारामती 13, इंदापूर 26, जुन्नर 17, आंबेगाव 21, खेड 23, शिरूर 4, मावळ 9, मुळशी 11 आणि हवेली तालुक्यातील 7 अशा 12 तालुक्यांतील एकूण 221 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे, असे जिल्हा निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले.