फलोत्पादन pudhari
पुणे

शेतकरी फलोत्पादन प्रशिक्षणासाठी 56 लाख मंजूर ; आठ संस्थांमार्फत शेतकर्‍यांना प्रशिक्षण

पुढारी वृत्तसेवा

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत 2024-25 या वर्षाकरिता शासनाने यापूर्वी निश्चित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मनुष्यबळ विकास घटकांतर्गत राज्यामध्ये संस्थानिहाय शेतकरी प्रशिक्षणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याकरिता 56 लाख रुपयांचा कार्यक्रम मंजूर करण्यात आला असून, निश्चित करण्यात आलेल्या आठ संस्थांमार्फत शेतकर्‍यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालक डॉ. के. पी. मोते यांनी दिली.

प्रशिक्षण हा एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाचा अविभाज्य घटक आहे. या कार्यक्रमांतर्गत शेतकरी, क्षेत्रीय अधिकारी, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येते. फलोत्पादन पिकांचे उत्पादन व उत्पादकता वाढविण्याचे तंत्रज्ञान शेतकर्‍यांनी शास्त्रोक्त पद्धतीने अवलंब करण्यासाठी, तसेच उत्पादनांचे काढणीत्तोर व्यवस्थापन, निर्यातीला चालना देण्याच्या उद्देशाने अशी प्रशिक्षणे आयोजित करण्यात येतात. त्याचप्रमाणे प्रशिक्षण प्रभावी होण्यासाठी यामध्ये प्रात्यक्षिकांचे आयोजन, तसेच यशस्वी व प्रगतिशील शेतकर्‍यांच्या प्रक्षेत्रांना भेटी दिल्या जातात.

मनुष्यबळ विकास कार्यक्रम या घटकाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे प्रतिप्रशिक्षणार्थी एक हजार रुपये प्रतिदिवस याप्रमाणे रकमेचा मापदंड असून तीन ते पाच दिवस निवासी प्रशिक्षण घेण्यात येते. यामध्ये प्रशिक्षण साहित्य, चहा-पान, भोजन व निवास व्यवस्था आदींची सुविधा आहे. तरी, इच्छुक शेतकर्‍यांनी प्रशिक्षणासाठी निश्चित केलेल्या आठ संस्थांना, तसेच अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क साधण्याचे आवाहनही डॉ. मोते यांनी केले आहे.

प्रशिक्षणामध्ये अनुषंगिक विषयावर भर

शेतकर्‍यांना प्रशिक्षण कार्यक्रमात प्रामुख्याने फळे व भाजीपाला रोपवाटिका, कृषी व्यापाराबाबत धोरण व निर्यातीबाबत माहिती, जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन (आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी), ड्रॅगनफ्रूट व जिरॅनियम व नावीन्यपूर्ण पिकांचे उत्पादनाचे तंत्रज्ञान, औषधी-सुगंधी व मसाला पिकांचे उत्पादन व प्रक्रिया व विपणन, हरितगृह-पॉलिहाऊस व्यवस्थापन, हॉर्टिकल्चर एक्स्पोर्ट ट्रेनिंग कोर्स, काढणीपश्चात फळे व भाजीपाला व्यवस्थापन, पीकनिहाय डाळिंब, हळद व आले लागवड व प्रक्रिया आदींचा समावेश आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT