पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरातील पाळीव श्वानांसाठी (कुत्र्यांसाठी) महापालिकेकडून दिला जाणारा परवाना ऑनलाईन केल्यानंतर आठवड्यात शहरातील 550 नागरिकांनी पाळीव कुत्र्यांच्या परवान्यासाठी महापालिकेकडे अर्ज केले आहेत. महापालिकेकडून पाळीव प्राण्यासाठी परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. महापालिका हद्दीत अंदाजे साडेतीन लाख भटकी आणि 80 हजार ते एक लाखापर्यंत पाळीव कुर्त्यांची संख्या आहेत.
यामध्ये समाविष्ट गावांमधील कुर्त्यांंचाही समावेश आहे. शहरातील पाळीव कुर्त्यांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दर वर्षी परवाना घ्यावा लागतो. यासाठी कुत्र्याच्या मालकास त्याला रेबीज लस दिल्याचे प्रमाणपत्र, राहण्याच्या पत्त्याचा पुरावा, श्वानाचा फोटो, कर भरल्याची पावती, सोसायटीचे ना-हरकत प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करावी लागतात.
तसेच, स्वतःच्या जागेच्या हद्दीबाहेर, सार्वजनिक ठिकाणी किंवा रस्त्यावर श्वानाला मोकळे सोडणार नाही, सदर श्वानाने कुणाला दुखापत करू नये, यासाठी त्याच्या तोंडाला मुस्के घालणे, त्याला नैसर्गिक विधी करण्यासाठी रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी घेऊन जाणार नाही, असे प्रतिज्ञापत्रही लिहून द्यावे लागते. त्यानंतर महापालिका मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 चे परिशिष्ट 14. नियम क्र. 22 (अ)चे कलम 386 (1) नुसार सशुल्क परवाना आणि अटी व शर्तीचे कार्ड देते.
आतापर्यंत कुत्र्यांच्या परवान्याची सर्व प्रक्रिया यापूर्वी क्षेत्रीय कार्यालयांकडून मॅन्युअल पद्धतीने राबवली जात होती. मात्र, परवाना प्रक्रियेला लागणार्या विलंबामुळे परवाना घेण्यास फारसे कोणी पुढे येत नव्हते. शहरात 80 हजार ते एक लाख पाळीव कुर्त्यांची संख्या असताना गतवर्षात केवळ 2 हजार 236 परवान्यांची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी परवाने घ्यावेत, यासाठी आरोग्य विभागाने परवान्याची संपूर्ण प्रक्रिया 11 नोव्हेंबरपासून ऑनलाईन केली आहे. आतापर्यंत 550 नागरिकांनी परवान्यासाठी अर्ज
केला आहे.
पाळीव श्वानांसाठी महापालिकेची परवानगी असणे बंधनकारक आहे. नागरिकांना परवान्यासाठी महापालिकेत किंवा क्षेत्रीय कार्यालयात चकरा माराव्या लागू नये, यासाठी परवान्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
– डॉ. सारिका फुंडे-भोसले, मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी, महापालिका.