पुणे

पुणे जिल्ह्यात रस्त्याचे 53 हजार कोटींचे प्रकल्प

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्त्याच्या कामांसाठी 53 हजार कोटी रुपये लागणार आहेत. त्या कामांसाठी विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येत असल्याचे केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी सांगितले. पहिल्या चार प्रकल्पांचा डीपीआर तयार केला जात आहे. दिवेघाट ते हडपसर मार्गाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. गडकरी म्हणाले, पुण्याबाहेरील रिंगरोड करण्याची आमची तयारी होती. मात्र, राज्य सरकारने तो करीत असल्याचे सांगितले.

त्यातील काही भाग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत होत आहे. पुण्याहून सोलापूर, नाशिक, नगरकडे जाणाऱ्या मार्गांचे भूसंपादनाचे काम सुरू आहे. ही कामे करण्यासाठी राज्य सरकारने जीएसटी माफ करावा, तसेच जमीन उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे कामे लवकर सुरू करता येतील. रेल्वेचा वापर करून जेएनपीटीपर्यंत मालवाहतूक केली पाहिजे. मनमाडवरून दौंड, पुणेमार्गे मालवाहतूक करता येईल.

पुणे ते नागपूर पाच तासांत
पुण्याहून नागपूरदरम्यानचा प्रवास पाच तासांत होईल. नागपूर ते औरंगाबाद तीन तासांत, तर तेथून पुढे पुण्यास येण्यास दोन तासांचा कालावधी लागेल, असे रस्ते बनविले जातील, असे नितीन गडकरी यांनी सांगितले. पुणे ते बंगळुरू हा 706 किलोमीटरचा महामार्ग झाल्यानंतर, तो पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी प्रगतीचा महामार्ग ठरेल, असे त्यांनी सांगितले

प्रकल्प व निधी
पुणे- बंगळुरू ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे (12 हजार कोटी रुपये)
पुणे- औरंगाबाद रस्ता (10,232 कोटी रुपये)
नाशिकफाटा ते खेडदरम्यान 29 किलोमीटर लांबीचा डबलडेकर मार्ग (8841 कोटी रुपये)
पुणे ते शिरूर 56 किलोमीटरचा उन्नतमार्ग (दहा हजार कोटी रुपये)
तळेगाव ते चाकण हा 54 किलोमीटरचा मार्ग (11 हजार कोटी रुपये)
दिवेघाट ते हडपसर (100 कोटी रुपये)

SCROLL FOR NEXT