पुणे: यंदाचा मान्सून शहरावर विशेष मेहरबान आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांत शहरात तब्बल 511 मिलिमीटर पाऊस झाला आहे. शहराची वार्षिक सरासरी 700 ते 750 मिलिमीटर इतकी आहे. मात्र, दोनच महिन्यांत शहरात वर्षाच्या 70 ते 80 टक्के सरासरीइतका पाऊस झाला आहे. त्यामुळे मागील पन्नास वर्षांतील सरासरी पावसाचा विक्रम यंदा मोडीत निघाला आहे.
यंदा मान्सूनने अनेक विक्रम मोडले. याआधी शहरात मान्सून कधीच मे महिन्यात आला नव्हता. यंदा तो शहरात 26 मे रोजी दाखल झाला. याआधी 5 जूनपर्यंत मान्सून आल्याचे तपशील उपलब्ध आहेत. मात्र र्मेमध्ये शहरात तुफान पाऊस झाला. त्यामुळे शहरातील उन्हाळा लवकर संपला आणि जमिनीची धूप कमी होऊन पावसाने जमीन ओली झाली. (Latest Pune News)
जंगलातील प्राणी आणि जनावरांना यंदा मे महिन्यातच पिण्याचे पाणी भरपूर मिळाल्याने मे अनोखा ठरला. यंदा 17 ते 27 मे या दहा दिवसांत तब्बल 270 मि.मी. पाऊस झाला. गत 50 वषार्ंतील हा विक्रमी पाऊस ठरला. तर 23 जून पर्यंत शहराची जूनची सरासरी ही 241 मि.मी. इतकी भरली आहे.
घाटमाथ्यावर विक्रमी पाऊस
शहरात जो पाऊस पडतो त्याला घाट माथ्यावरची स्थिती कारणीभूत असते. यंदा घाट माथ्यावरचा पाऊस हा जूनमध्येच सरासरी 1 हजार मिलीमीटरपेक्षा जास्त झाला आहे. मे आणि जूनमध्ये या भागात देशात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्याचा परिणाम शहराच्या पर्जन्यमानावर झाला आहे.
महिनाभरात दीड टीमसीची भर
आजवर शहरातील धरणांत जूनमध्ये (दीड टीमसी) इतकी भर पडली नव्हती. तज्ज्ञांच्या मते, मागील साठ वर्षांत अशी स्थिती प्रथमच झाली आहे. मे महिन्यात झालेला 275 टक्के जास्त पाऊस आणि जूनमधील 80 टक्के जास्त पावसाने धरणांत मोठी भर घातली. एकट्या जून महिन्यात दीड टीएमसी पाणीसाठा जमा झाला, हादेखील एक विक्रमच आहे. मे महिन्यात विक्रमी पावसाची कमाल
यंदाच्या मे महिन्यात शहरात गत 64 वर्षांतला विक्रमी पाऊस झाला. शिवाजीनगर भागात 260 मिलिमीटर, पाषाण 270, तर लोहगाव भागात सर्वाधिक 325 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. हा पाऊस मान्सून हंगामात गृहीत धरला गेला नसता, तरी हा बोनस पाऊस शहराच्या पर्जन्यमानात चांगलीच भर घातली. शहरात सरासरी 750 मिलिमीटर पाऊस जून ते सप्टेंबर या कालावधीत पडतो. मात्र, मेमध्येच 270 मिलिमीटर अवकाळी पावसाची भर पडली, तर 23 जूनपर्यंत 241 मिमी पाऊस झाला. अजून जूनचे 7 दिवस बाकी आहेत. त्यामुळे यंदाच्या मान्सून हंगामातील पाऊस सप्टेंबरअखेर 1500 मिमी पार करेल, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.
शहरातील जूनची सरासरी : 156 मि.मी.
मागच्या वर्षी जूनमध्ये पडलेला पाऊस : 120 मि.मी.
यंदा 23 जूनपर्यंत पडलेला पाऊस : 241 मि.मी. (80 टक्के जास्त)
मे 2025 मध्ये पडलेला पाऊस : 270 मि.मी. (275 टक्के जास्त)
23 जूनपर्यंत पाऊस (विभागानुसार)
शिवाजीनगर : 241.7 मि.मी., पाषाण : 277.6 मि.मी., लोहगाव : 232 मि.मी. यंदा मान्सूनसाठी चांगली स्थिती होती. राज्यातील इतर भागांत जूनमध्ये पावसाचा खंड होता. मात्र, पुण्यात हा खंड नव्हता. याचे कारण हा हवेचा दाब अन् वार्याची दिशा शहरात योग्य असल्याने या सकारात्मक परिस्थितीमुळे रेकार्डब्रेक पाऊस झाला.