पुणे: रेल्वे सुरक्षा बलाने स्थापना दिनानिमित्त पुणे रेल्वे स्थानकावर केलेल्य विशेष मोहिमेत एका संशयित व्यक्तीकडून तब्बल 51 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली. आरपीएफने या व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडे आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे.
आरपीएफने दिलेल्या माहितीनुसार दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी पुणे रेल्वे स्थानकावर अंबेला गेटसमोरील सरकता जिना चढून गेल्यावर पादचारी पुलावर असलेल्या बॅगेज स्कॅनर मशिनद्वारे प्रवाशांच्या सामानाची तपासणी सुरू होती. (Latest Pune News)
त्यावेळी गुजरातच्या मेहसाणा येथील 24 वर्षीय फरदीनखान जफरउल्ला खान मोगल याच्या दोन बॅगा संशयास्पद वाटल्या, त्यांची तपासणी केली असता, त्याच्याकडे असलेल्या जांभळ्या रंगाच्या बॅगेत सुमारे 22 लाख रुपये आणि लाल रंगाच्या बॅगेत सुमारे 29 लाख रुपये, अशी एकूण 51 लाख रुपयांची रोकड सापडली. या पैशांसंबंधी फरदीनखान कोणताही समाधानकारक खुलासा देऊ शकला नाही, त्यामुळे त्याला ताब्यात घेण्यात आले.
आरपीएफ जवानांचे अभिनंदन
ही यशस्वी कामगिरी आरपीएफ निरीक्षक सुनील कुमार यादव यांच्या नेतृत्वाखाली एएसआय प्रदीप चौधरी, एएसआय संतोष जायभाये, एएसआय विलास दराडे, एएसआय संतोष पवार आणि एमएसएफ स्टाफ कृष्णा भांगे यांनी बजावली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे रेल्वेच्या वर्तुळात सर्वत्र कौतुक होत आहे.
आयकर विभागाच्या ताब्यात दिले
वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आणि सहाय्यक सुरक्षा आयुक्त, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेली रोकड आणि आरोपी फरदीनखान याला पुढील तपासासाठी आयकर विभाग, पुणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. आयकर अधिनियम, 1961 नुसार अशा मोठ्या आणि संशयास्पद रोकडची माहिती तत्काळ आयकर विभागाला देणे अनिवार्य आहे. त्यामुळे हे प्रकरण आयकर विभाग पुणे यांच्याकडे दिले आहे, असे आरपीएफने सांगितले.
रेल्वे प्रवास करताना मोठी रोकड किंवा मौल्यवान वस्तू सोबत ठेवू नये. कोणत्याही संशयास्पद हालचालीची माहिती तत्काळ हेल्पलाइन क्रमांक 139 वर किंवा जवळच्या आरपीएफ पोस्टवर द्यावी. आपली सुरक्षा आमची प्राथमिकता आहे. त्यामुळे मौल्यवान वस्तू प्रवासात सोबत ठेवू नये.- सुनील यादव, आरपीएफ निरीक्षक, पुणे रेल्वे स्थानक