बेपत्ता मुलीसाठी 500 पोलिसांचे ‘ऑपरेशन सर्च’ Pudhari
पुणे

Pune : बेपत्ता मुलीसाठी 500 पोलिसांचे ‘ऑपरेशन सर्च’

पुढारी वृत्तसेवा

बिबवेवाडी भागातून बेपत्ता झालेली दहा वर्षांची मतिमंद मुलगी कोंढव्यातील एनआयबीएममध्ये सापडली. बुधवारी (दि. 14 ऑगस्ट) बिबवेवाडी भागातील पापळवस्ती परिसरात ती बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांकडून अपहरणाच्या शक्यतेने मुलीचा शोध घेण्यात येत होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्याला भेट दिली. तब्बल 500 पोलिसांनी शोधमोहीम राबविल्यानंतर गुरुवारी (दि. 15) मध्यरात्री तीन वाजता मुलगी सापडली. खाद्यपदार्थ घरपोहोच करणार्‍या (डिलिव्हरी बॉय) एका तरुणाने मुलीला पाहिले. तरुणाच्या तत्परतेमुळे मुलीचा शोध लागला.

पोलिस आयुक्तांनी शोधमोहिमेत सहभागी असलेल्या पोलिस पथकाला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. महिला आणि मुलींची सुरक्षा हा पुणे शहर पोलिसांचा सर्वोच्च प्राधान्याचा विषय असल्याचेदेखील आयुक्तांनी म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी मूळची उत्तर प्रदेशातील आहे. मार्केट यार्डमध्ये तिचे वडील आणि चुलते हमालीचे काम करतात. आपल्या आईसोबत ती पुण्यात आली होती. बिबवेवाडीतील पापळवस्तीत तिचे वडील आणि चुलते राहतात. थोड्या अंतराच्या फरकावर दोघांच्या खोल्या आहेत. मुलीच्या चुलत्यांचे लहान बाळ आहे. मुलगी चुलत्याच्या घरी गेली होती. खेळत खेळत ती घराबाहेर पडली. मात्र, नवीन शहर आणि घराचा अंदाज न आल्याने ती गंगाधाम रस्त्याने काकडेवस्ती येथून खडी मशिन चौक असे करत ती कात्रज चौक परिसरात गेली.

बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास बेपत्ता झाली. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला. मात्र, तिचा ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. बिबवेवाडी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्याला भेट दिली. तपासाबाबत त्यांनी सूचना केल्या. गुन्हे शाखेच्या पथकांकडून गुरुवारी (दि. 15 ऑगस्ट) दिवसभर शोधमोहीम राबविण्यात आली. पोलिसांनी बिबवेवाडी, कात्रज परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. एका चित्रीकरणात मुलगी एका व्यक्तीबरोबर बोलताना दिसली. त्यामुळे पोलिसांना अपहरणाची शक्यता वाटली. त्या द़ृष्टीनेही तपास सुरू करण्यात आला. स्थानिक पोलिस ठाण्यांच्या पथकाबरोबर गुन्हे शाखेची सर्व पथके मुलीचा शोध घेत होती. पोलिसांनी मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती छायाचित्रासह समाज माध्यमात प्रसारित केली. मुलगी कात्रजकडे गेल्याचे आढळून आले होते. बेपत्ता मुलीची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले होते. दरम्यान, एका नागरिकाला ही मुलगी कोंढवा परिसरात आढळली. त्याने पोलिसांना खबर देताच पथके तेथे रवाना झाली. अखेर रात्री मुलीचा शोध लागला. तिला बिबवेवाडी पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मुलगी सापडल्याने तिच्या कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या रात्रीपासून सुरू असलेला अलर्ट ही मुलगी सापडल्यानंतर संपला अन् पोलिस अधिकार्‍यांनी नि:श्वास सोडला.

मुलगी नुकतीच उत्तर प्रदेशातून आईसोबत पुण्यात वडिलांकडे आली होती. तिचे वडील आणि चुलते मार्केट यार्डात हमालीचे काम करतात. चुलत्याच्या घरी गेल्यानंतर ती बाहेर पडली. तिला गल्ली-बोळांमुळे घराचा रस्ता सापडला नाही. ती तशीच रस्ता दिसेल तशी भटकत राहिली. मतिमंद असल्याने तिला कोणाला काही सांगताही येत नव्हते. मुलगी असल्याने काही अघटित घडायला नको म्हणून आम्ही तिला शोधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. सध्या ती सुखरूप असून, तिला नातेवाइकांच्या ताब्यात दिले आहे.
- मंगल मोढवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बिबवेवाडी.
SCROLL FOR NEXT