पुणे

सीटीईटीमध्ये ईडब्ल्यूएसला आता 5 टक्के गुणांची सवलत

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक अर्थात ईडब्ल्यूएस प्रवर्गाला पाच टक्के गुणांची सूट देण्यात आली होती. परंतु केंद्र सरकारच्या वतीने घेण्यात येणार्‍या सीटीईटीला हा निर्णय लागू नव्हता. परंतु आता मात्र सीटीईटीमध्येदेखील हा निर्णय लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सीटीईटी देणार्‍या या प्रवर्गातील हजारो विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे.

राज्याचे कक्ष अधिकारी म.मि.काळे यांनी शिक्षण विभागातील अधिकार्‍यांना दिलेल्या निर्देशानुसार, 1 ली ते 8 वी च्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षकांच्या पदांकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, सर्व भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, दिव्यांग उमेदवार इतर प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी पात्रता गुणांमध्ये 5 टक्के सूट देण्यात आली आहे.

परंतु राज्याच्या शासन निर्णयात केंद्र शासन व राज्य शासन आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा असा स्पष्ट उल्लेख नसल्याने सीटीईटी उत्तीर्ण उमेदवारांना गुणांमध्ये 5 टक्के सूट देण्याबाबत संभ—म निर्माण झाला. त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे केंद्र शासन व राज्य शासन आयोजित किंवा केंद्र शासन किंवा राज्य शासन यांनी प्राधिकृत केलेल्या अभिकरणाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा अशी स्पष्ट व्याख्या व पात्रता गुणांमधील सूट याबाबतची तरतूद महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मध्ये नमूद आहे. त्यामुळे पात्रता गुणांच्या टक्केवारीत देण्यात आलेली सूट दोन्ही शिक्षक पात्रता परीक्षेकरिता लागू आहे.

ईडब्ल्यूएसला राज्यात सीटीईटीमध्ये पाच टक्के सूट देण्यात यावी यासंदर्भात पाठपुरावा सुरू होता. त्याला यश आले आहे, राज्यातील हजारो ईडब्ल्यूएस उमेदवारांना फायदा होणार आहे. ईडब्ल्यूएसमध्ये सवलत देणारे महाराष्ट्र पहिले राज्य ठरले आहे.

– संतोष मगर, संस्थापक अध्यक्ष,
डी. टी. एड., बी. एड. स्टुडंट्स असोसिएशन

SCROLL FOR NEXT