पौड: मुळशी तालुक्यातील माले, संभवे, मुळशी आणि गोणवडी या गावांमध्ये राज्य सरकारच्या पशुधन विभागाच्या वतीने शेतकर्यांच्या पशुधनास आवश्यक असणारे लाळ-खुरकूत व विविध विषाणुजन्य आजार प्रतिबंधात्मक लसीकरण मागील वर्षभरापासून झालेले नाही, असे येथील शेतकरी नाना पासलकर यांनी सांगितले.
परिणामी, या भागातील पाच दुभत्या गायी लाळ-खुरकूत व अन्य आजार होऊन दगावल्या असून, शेतकर्यांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे व एका म्हशीचे ताप आल्याने डोळे गेले आहेत. (Latest Pune News)
या भागात सरकारी पशुवैद्यकीय पर्यवेक्षक उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे येथील पशुधन पालकांना खासगी डॉक्टरांकडून जनावरांवर उपचार करण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकर्यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
काहीवेळा जनावरांवर जुने गावठी घरगुती उपचार करून घ्यावे लागतात. परंतु, यातील जाणकार लोक आता नसल्याने यातही धोका आहे. नाना पासलकर यांच्या चार गायी दगावल्या. प्रकाश झोरे यांची गाय लाळ-खुरकूतने दगावली. राजेंद्र ढमाले यांच्या म्हशीचे तापाने डोळे गेले.
येत्या आठ दिवसांत लाळ्या-खुरकूत लस उपलब्ध करून लसीकरण सुरू करणार आहे. तोपर्यंत तेथील डॉक्टरांना परिस्थितीचा आढावा घ्यायला सांगितला आहे. परराज्यातून व्यापारी व दूध उत्पादक शेतकरी दुधाळ जनावरांना घेऊन आपल्या इकडे येतात. त्यांनी हे प्रतिबंधात्मक लसीकरण केले नसेल तर त्यामुळेदेखील लाळ-खुरकूत हा रोग होतो व त्याचा प्रादुर्भाव इकडील जनावरांना होतो. तसेच पावसाळ्यात जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, तेदेखील एक कारण या आजाराचे असते.- बाळासाहेब गायकवाड, सहायक आयुक्त, जिल्हा पशुसंवर्धन विभाग, औंध
दि. 6 ऑगस्ट रोजी पौड येथील पशुधन अधिकारी यांना संपर्क साधून जनावरांच्या आजारांची कल्पना दिली होती. आता आमची जनावरे चार दिवसांपूर्वी दगावली व याबाबत पौड येथील डॉक्टरांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. आमची जनावरे दगावल्यानंतर येऊन काय पाहणी करणार आहेत?- नाना पासलकर, पशुधनपालक, माले
संबंधित शेतकर्याच्या घरी त्यांच्या पशुधनावर उपचार करण्यासाठी आमचे पथक गेले होते. त्यांनी या पथकाकडून त्यांच्या पशुधनावर उपचार करून घेतले नाहीत. जनावरे दगावली तर त्यांची मृत्यूपश्चात वैद्यकीय तपासणी करून घ्यायला हवी होती. माले येथे पाहणी करणार आहे.- सोनल हिंगाडे, पशुधन अधिकारी, पौड