पुणे

51 दुर्गम गावांमध्ये लवकरच 4 जी नेटवर्क; खेड, जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील या गावांमध्ये बीएसएनएल टॉवर उभारणार

अमृता चौगुले

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : जिल्ह्यात ज्या गावांमध्ये सध्या मोबाईलचे कोणत्याही प्रकारचे नेटवर्क नाही, अशा गावांमध्ये केंद्र शासनाच्या म4-जी सॅच्युरायझेशनफ उपक्रमांतर्गत मोबाईल, इंटरनेटचे नेटवर्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत खेड, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील दुर्गम व आदिवासी भागांतील 51 गावांमध्ये 4 जी नेटवर्क देणारे मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आहेत.
या योजनेमुळे येत्या काही दिवसांत ग्रामीण भागातील दुर्गम भागातील गावेदेखील मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून जगाशी जोडली जाणार आहेत. योजनेंतर्गत निवड झालेल्या सर्व गावांसाठी पूर्णपणे भारतीय बनावटीचे 4-जी टॉवर उभारण्यात येणार आहेत.

डिसेंबर 2023 अखेर ही सेवा प्रत्यक्ष सुरू होईल. सध्या यासाठी संबंधित ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेली सरकारी, गायरान अथवा ग्रामपंचायतीच्या मालकीची जागा ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी मबीएसएनएलाफ या कामासाठी त्वरित जागा उपलब्ध करून द्या, असे आदेशदेखील दिले आहेत.

एका टॉवरसाठी लागणारी 200 चौरस मीटर जागा व त्यासाठी लागणारी वीजजोडणी मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी भूमिगत केबल टाकण्यास विनाशुल्क परवानगी देण्यात आली आहे. या उपक्रमामुळे नेटवर्कविरहित गावांमध्ये डिजिटल इंडिया संकल्पनेस पाठबळ मिळणार आहे.

…. ही आहेत 51 गावे

  • आंबेगाव : साकेरी, मेघोली, नांदूरकीची वाडी, फुलवडे, पिंपरी, सावरली, कुशेरी बु., पाटण, न्हावेड, बोरघर,महाळुंगे तर्फे आंबेगाव, तिरपाड, आघाने, पिंपरगणे, आहुपे,
  • जुन्नर : आंबोली, फागुल गव्हाण,
  • खेड : तिफनवडी, कासारी, गडद, वाघू, आडगाव, भलवडी,
    आढे, विरहाम, वेताळे, तोरणे, वांद्रे, खरपुड, जैदवाडी, भीमाशंकर
    वाडी, भोरगिरी.
SCROLL FOR NEXT