पुणे

खोदकाम झाडांच्या मुळावर ! पुणे शहरातील 43 हजार झाडे धोकादायक

अमृता चौगुले

हिरा सरवदे : 

विविध प्रकारची विकास कामे आणि वाहिन्यांसाठी केली जाणारी खोदाई शहरातील झाडाच्या मुळावर उठत असून खोद कामांमुळे झाड्यांच्या मुळ्या तुटून झाडांना धोका निर्माण होत आहे. दरम्यान, शहरातील 55 लाख झांडापैकी 43 हजार 303 झाडे धोकादायक असल्याचे महापालिकेने केल्या झाडांच्या सर्वेमध्ये आढळले आहे.

पुणे शहराचा आकार बशीसारखा असून शहराच्या आसपास मोठ्या प्रमाणात डोंगर आणि टेकड्या आहेत. या डोंगरांवर आणि टेकड्यांवर मोठ्या प्रमाणात वनराई आहे. शिवाय शहरातील विविध रस्ते, सार्वजनिक आणि खासगी जागांवरही मोठ्या प्रमाणात लहान-मोठ्या आकाराची झाडे आहेत. त्यामुळे शहराला संपन्न असा पर्यावरणाचा वारसा लाभलेला आहे. या वारशामुळे देशभरातील नागरिक पुणे शहरात राहण्यास प्राधान्य देतात. हाच वारसा जनत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रेमी काम करतात. महापालिकेच्या नोंदीनुसार शहरात 55 लाख झाडे आहेत.

मात्र, महापालिका व खासगी स्वरूपाच्या विकास कामांसाठी आणि विविध सेवा वाहिन्या टाकण्यासाठी केल्या जाणार्‍या खोदाईमुळे झाडांच्या मुळांचे नुकसान होते. त्यामुळे खोदाईनंतर दोन तीन वर्षे उभे दिसणारे झाड लहान मोठ्या वार्‍यांमुळे कोसळते. परिणामी वाहने, इमारती आणि मनुष्यहानी होते. महापालिकेने केलेल्या सर्वेमध्ये 55 लाख झाडांमध्ये 43 हजार 303 झाडे खोदाई व इतर कारणांमुळे धोकादायक स्थितीमद्ये असल्याचे आढळून आले आहे.

मुळाशी जाळला जातोय कचरा
सध्या झाडाच्या मुळाशी कचरा जाळण्याचे वा आग लावण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे झाडाची मुळे जळतात. झाडातील सजीवपणा नष्ट होऊन ते आपोआप वाळते. मग वाळलेले झाड पाडताना कायद्याच्या अडचणीही येत नाहीत. अनेकवेळा बांधकाम व्यावसायिक झाडांच्या मुळाशी विषारी रसायने टाकून ती निर्जीव करतात. यासंदर्भात पर्यावरणप्रेमींनी पालिकेच्या उद्यान विभागातही तक्रारी केल्या आहेत.

काँक्रिटीकरण ठरतेय मारक
रस्त्यांवर झाडांच्या कडेने काही प्रमाणात तरी मोकळी जमीन सोडणे अपेक्षित असताना, प्रत्यक्षात झाडाला अगदी खेटूनच डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण केले जाते. परिणामी, झाडे कमकुवत होतात. रस्ते रुंद करताना किंवा पदपथ करताना अनेक झाडांची मुळे तोडली जातात. खोडाच्या आसपास माती राखली जात नाही.

महापालिकेकडून दरवर्षी शहरातील झाडांची गणना केली जाते. यामध्ये धोकादायक आढळणारी झाडे महापालिकेकडून काढली जातात. अनेकवेळा धोकादायक झाडे किंवा फांद्या कापताना पर्यावरणप्रेमींचा विरोध होतो. मात्र, तेच झाड किंवा फांदी कोसळून अपघात झाला तर महापालिकेलाच जबाबदार धरले जाते. अनेकवेळा खोदाईमुळे झाडांची मुळे तुटतात. असे झाड वरून जरी सुस्थितीमध्ये दिसत असले तरी ते कालांतराने कोसळते.

                                       – अशोक घोरपडे, उद्यान विभागप्रमुख, महापालिका

SCROLL FOR NEXT