हॉटस्पॉट  Pudhari
पुणे

पुणे शहरात पक्ष्यांचे 422 हॉटस्पॉट

पुणे राज्यात दुसर्‍या क्रमांकाचे पक्षी श्रीमंत शहर ठरले

पुढारी वृत्तसेवा

पुणे : शहरात अजूनही चांगली जैवविविधता असल्याने एकूण 422 ठिकाणी पक्ष्यांचे हॉटस्पॉट आढळले असून, तेथे पक्ष्यांच्या 248 प्रजाती आढळून आल्या आहेत. त्यामुळे पुणे महापालिकेने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मत पक्षी तज्ज्ञांनी नोंदविले आहे. ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट 2025 या देशभरात झालेल्या पक्षी गणनेत पुणे शहरातील ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञांसह तरुण आणि बाल पक्षी निरीक्षकांनी मोठा सहभाग घेतल्याने शहरातील बावीस टेकड्यांसह अनेक पाणथळींच्या जागेवर सुमारे 248 प्रकारच्या विविध प्रजातींचे पक्षी असल्याची नोंद केली आहे. त्यामुळे पुणे राज्यात दुसर्‍या क्रमांकाचे पक्षी श्रीमंत शहर ठरले आहे.

राज्यात 418, शहरात 248 प्रजाती

पक्षी निरीक्षकांनी 14 ते 18 फेब—ुवारी या चार दिवसांत देशभरात नोंदलेल्या 1 हजार 77 पक्ष्यांच्या प्रजाती नोंदवल्या. त्यापैकी महाराष्ट्रात एकूण 418, तर पुणे शहरात 248 प्रजाती आढळल्या. या पक्षी निरीक्षण कार्यक्रमात शहरातील 200 हून अधिक पक्षीप्रेमींचा उत्साही सहभाग होता. ते शहरातील वीसपेक्षा जास्त बर्डवॉकमध्ये सहभागी झाले होते.

या दुर्मीळ प्रजाती आढळल्या

या पक्षीगणनेत युरोपियन हनी बझार्ड या दुर्मीळ पक्षाची प्रजाती वेताळ टेकडीवर दिसली. त्यामुळे सहभागींसाठी भावनिक आकर्षण निर्माण झाले. तसेच पेरेग्रीन फाल्कन, स्टेप्पे ईगल, फॉरेस्ट वॅगटेल आणि ब्लूथ—ोट यांचा समावेश होता.

एआरएआय, वेताळ टेकडीवर सर्वाधिक प्रजाती

एआरएआय, वेताळ टेकडी येथे पक्ष्यांच्या प्रजातींची सर्वाधिक संख्या (114) नोंदवली गेली. त्यानंतर भिगवण (104), कुंभार गाव पक्षी अभयारण्य (103), बाणेरमधील मुळा नदी (97) आणि कवडी पाट (95) यांचा क्रमांक लागतो.

शहराने दिल्या सर्वाधिक चेकलिस्ट

पक्षी गणनेची ही बारावी आवृत्ती होती. यात शहरातील दोनशे पक्षी निरीक्षकांनी राज्यात सर्वाधिक 3 हजार 672 इतक्या चेकलिस्ट सादर केल्या. शहरात पक्ष्यांचे 422 हॉटस्पॉट सापडले. सर्व वयोगटातील सहभागींना आकर्षित करून अनेक ठिकाणी पक्षी फेरीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात वेताळ टेकडी आणि राम-मुळा संगम यासारख्या तणावग्रस्त अधिवासांचे संरक्षण करण्याची गरजदेखील अधोरेखित करण्यात आली.

यंदा पक्षी निरीक्षकांची संख्या जास्त होती. त्यामुळे शहरातील सुमारे 422 ठिकाणी जावून पक्षीनिरीक्षण करता आले. शहरात 248 प्रकारच्या प्रजाती आढळल्या ही सुखद बाब आहे. अजूनही चांगली जैवविविधता शहरात उपलब्ध असल्याचे हे लक्षण आहे. पुणे महापालिकेने पक्ष्यांसाठी पुढाकार घेत काही योजना केल्या पाहिजे. पक्षी निरीक्षण स्थळे शहरात मोठ्या प्रमाणावर विकसित करणे शक्य आहे.
अनुज खरे, वन्यजीव अभ्यासक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT