पुणे

पुणे : तक्रारींचा पाऊस! पीएमपीच्या चालक-वाहकांविरोधात 4200 ‘कम्प्लेंट’!

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: बसथांब्यावर बस थांबविली नाही, थांब्यावर गाडी उशिरा आणली, गाडी अस्वच्छ आहे, नवीन मार्ग करावा, चालक-वाहकांनी गैरवर्तन केले, चालक मोबाईलवर बोलत होता, सिग्नल पाळला नाही, गाडी वेगाने चालवली, यांसारख्या 4 हजार 273 चालक-वाहकांच्या तक्रारी पीएमपी प्रशासनाला चालू वर्षात आल्या आहेत. त्या सर्वच्या सर्व पीएमपीकडून सोडविण्यात आल्या आहेत.

पीएमपीच्या ताफ्यात सुमारे 10 हजारच्या आसपास कर्मचारी आहेत. त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक म्हणजेच 7 हजार 72 चालक-वाहक आहेत. चालक-वाहक हे पीएमपीच्या बसगाड्यांप्रमाणेच या सार्वजनिक वाहतुकीचा कणा आहेत. पीएमपीच्या तक्रार निवारण केंद्राला जानेवारी ते सप्टेंबर 2022 या काळात या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

यातील काही पीएमपी प्रशासनाला सेवा सुधारण्यासाठी केलेल्या सूचना आहेत. तर गाड्यांच्या दुरवस्थेबाबत आणि चालक-वाहकांच्या गैरवर्तनाबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. यामुळे पीएमपीच्या सेवेत बदल घडण्यासाठी आता हातभार लागत आहे.

असे होते तक्रारींचे निवारण
पीएमपी प्रशासनाला कंट्रोल रूममध्ये प्राप्त झालेल्या तक्रारी आगारस्तरावरच सोडविण्यावर भर दिला जातो. एखादी तक्रार आगारपातळीवर म्हणजेच तृतीय स्तरावर सुटली नाही, तर ती दुय्यम स्तरावर म्हणजेच सहव्यवस्थापकीय संचालकांकडे येते. तेथेही सुटली नाही तर पीएमपीचे अध्यक्ष स्वत: लक्ष देऊन या तक्रारी सोडवतात. या वेळी संबंधित चालक-वाहकांवर कडक कारवाई करण्यात येते.

वर्षभरात 4 हजार 273 तक्रारी
जानेवारी – 366, फेब—ुवारी – 359, मार्च – 480, एप्रिल – 651, मे – 601, जून – 565, जुलै – 608, ऑगस्ट – 643

इथे करा तक्रार
फोन क्रमांक – 020 – 24545454
एसएमएस/मोबाईल/व्हॉट्सअ‍ॅप क्र. 9881495589
ई-मेल आयडी – Complaints@pmpml.org

पीएमपी चालक-वाहकांसंदर्भात तक्रारी आणि सूचना आल्यावर त्या तत्काळ सोडविण्यावर भर दिला जात आहे. सर्व तक्रारी तत्काळ सोडविण्यात आल्या आहेत. तक्रारी आगार पातळीवर डेपो इंजिनिअर, डेपो मॅनेजर स्तरावर सोडविल्या जात आहेत. संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

                                       – अनंत वाघमारे, बीआरटी मॅनेजर तथा तक्रार विभागप्रमुख

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT