दीपेश सुराणा :
पिंपरी : शहरात 12 ते 14 वयोगटांतील 36 हजार 486 मुलांनी आत्तापर्यंत पहिला डोस घेतला आहे. त्या तुलनेत 20 हजार 984 मुलांनीच दुसरा डोस घेतला आहे. म्हणजे कोरोनाच्या दुसर्या डोसपासून जवळपास 42.49 टक्के मुले वंचित राहिली आहेत.
मुलांच्या लसीकरणाचे प्रमाण चिंताजनक
शहरामध्ये 16 जानेवारी 2021 पासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला हेल्थकेअर वर्कर, फ—ंटलाइन वर्कर तसेच ज्येष्ठ नागरिक यांचे टप्पानिहाय लसीकरण सुरू झाले. त्यानंतर 45 ते 59, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. तसेच, 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण सर्वात शेवटी म्हणजे 16 मार्च 2022 पासून सुरू झाले. 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू होऊन जवळपास सात महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, त्या तुलनेत मुलांच्या लसीकरणाचे कमी असलेले प्रमाण चिंताजनक आहे.
15 हजार 502 मुलांचा दुसरा डोस बाकी
12 ते 14 वयोगटातील 36 हजार 486 मुलांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला. त्यापैकी 20 हजार 984 मुलांनी कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. म्हणजे जवळपास 15 हजार 502 मुलांनी अद्याप कोरोनाचा दुसरा डोस घेतलेला नाही. कोरोनाचा पहिला डोस घेतलेल्या मुलांच्या तुलनेत हे प्रमाण 42.49 टक्क्यांनी कमी आहे.
15 ते 18 वयोगटातील मुलांचेही दुर्लक्ष
शहरातील 15 ते 18 वयोगटांतील मुलांचेदेखील कोरोना लसीकरणाकडे दुर्लक्ष होत आहे. आत्तापर्यंत 73 हजार 961 मुलांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. त्या तुलनेत 52 हजार 778 मुलांनीच कोरोनाचा दुसरा डोस पूर्ण केला आहे. म्हणजे अद्याप 28.65 टक्के जणांनी दुसरा डोस घेतलेला नाही.
18 ते 44 वयोगटात सर्वाधिक लसीकरण
18 ते 44 वयोगटात सर्वाधिक लसीकरण झाले आहे. या वयोगटातील 12 लाख 8 हजार 177 जणांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. त्यापैकी 11 लाख 21 हजार 789 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. म्हणजे दोन डोस घेणार्यांचे प्रमाण जवळपास 92.84 टक्के इतके आहे.
शहरात कोर्बेव्हॅक्स लसीचा तुटवडा
शहरामध्ये 12 ते 14 वयोगटांतील मुलांना देण्यात येणार्या कोरोना प्रतिबंधक कोर्बेव्हॅक्स लसीचा सध्या तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून केंद्रांवर ही लस उपलब्ध नाही. त्याशिवाय, कोव्हिशिल्ड लसीचा साठादेखील अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहे. महापालिकेने या लस मिळाव्या, म्हणून राज्य शासनाकडे मागणी केलेली आहे. शहरात 1 तारखेपासून कोर्बेव्हॅक्स लस उपलब्ध नाही. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून 12 ते 14 वयोगटातील मुलांचे लसीकरण ठप्प झाले आहे.
गुरुवारीदेखील ही लस महापालिकेच्या 8 केंद्रांवर उपलब्ध असणार नाही. 14 ते 18 वयोगटातील नागरिकांना पहिला व दुसरा डोस तर, 18 वर्षापुढील नागरिकांना प्रिकॉशन डोस देण्यासाठी बुधवारी प्रत्येक केंद्रावर कोव्हॅक्सिनच्या 200 लस देण्यात आल्या. तर, 18 वर्षापुढील सर्वांना पहिला, दुसरा आणि प्रिकॉशन डोस देण्यासाठी कोव्हिशिल्डच्या प्रत्येकी 100 लस दिल्या गेल्या. त्या तुलनेत गुरुवारी मात्र, या लसची संख्या आणखी कमी करण्यात आली आहे. महापालिकेच्या 8 केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस प्रत्येकी 200 याप्रमाणे दिली जाणार आहे. तर, कोव्हिशिल्ड ही लस प्रत्येकी 50 याप्रमाणे देण्याचे नियोजन आहे.
कोर्बेव्हॅक्स लस 1 तारखेपासून उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे 12 ते 14 वयोगटांतील मुलांचे लसीकरण थांबविलेले आहे. ही लस उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा पूर्ववत लसीकरण सुरू होईल. त्याशिवाय, कोविशिल्ड लसचा साठाही मर्यादित आहे. या लस मिळाव्या म्हणून राज्य शासनाकडे मागणी केलेली आहे.
– डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.