पुणे

मोशीतील खुल्या प्रदर्शन केंद्राला खर्च 42 कोटींचा; उत्पन्न फक्त दीड कोटी

अमृता चौगुले

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या जागेत साकारलेल्या खुल्या प्रदर्शन केंद्राच्या उभारणीसाठी 42 कोटी 27 लाख रुपयांचा खर्च पीएमआरडीएने केला आहे. गेल्या दीड वर्षात हे प्रदर्शन केंद्र विविध संस्थांसाठी भाडेरक्कम आकारुन देण्यात आले. त्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात फक्त 1 कोटी 57 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

पीएमआरडीएच्या वतीने मोशी येथील पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या जागेत पहिल्या टप्प्यात खुले प्रदर्शन केंद्र उभारण्यात आले आहे. 20 नोव्हेंबर 2020 मध्ये त्याचे काम पूर्ण झाले. हे खुले प्रदर्शन केंद्र 9.80 हेक्टर क्षेत्रावर आहे. तथापि, एकूण 20.11 हेक्टर क्षेत्रावर काम करण्यात आलेले आहे. त्यामध्ये जागेचे सपाटीकरण, अंतर्गत रस्ते (काँक्रीट आणि डांबरीकरण), आयकॉनिक प्रवेशद्वार, पावसाळी पाण्याची पाईपलाईन, एचपीसीएल पाईपलाइनवरील स्लॅब कल्वर्ट, स्वच्छतागृह, लॅन्डस्केपिंग, इलेक्ट्रिकल सबस्टेशन व फायरफायटिंग सुविधा, रिटेनिंग वॉल, जमिनीवरील पाण्याची साठवण टाकी आदी क्षेत्रास चेनलिंग फेन्सींगची कामे केली आहेत.

पुढील प्रदर्शनांचे नियोजनही तयार

खुल्या प्रदर्शन केंद्राच्या जागेत डिसेंबर महिन्यात 2 प्रदर्शन होणार आहेत. त्या माध्यमातून पीएमआरडीएला 1 कोटी 5 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्याशिवाय, 2024 मध्ये प्रस्तावित असलेल्या तीन प्रदर्शनांतून पीएमआरडीएला 1 कोटी 5 लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे, अशी माहिती पीएमआरडीएच्या अधिकार्‍यांनी दिली.

केंद्रासाठी मार्केटिंग गरजेचे

मोशीतील खुल्या प्रदर्शन केंद्रात जास्तीत जास्त प्रदर्शने व्हावीत, यासाठी पीएमआरडीए प्रशासनाने या प्रकल्पाची मार्केटिंग करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे, या जागेत विविध प्रदर्शने भरविण्यासाठी कंपन्यांना प्रोत्साहित करायला हवे. उद्योगांना बाजारपेठ मिळवून देण्याचा या प्रदर्शन केंद्राचा मूळ हेतू त्यानंतरच साध्य होणार आहे.

दीड वर्षामध्ये फक्त 5 प्रदर्शन

खुले प्रदर्शन केंद्र सुरुवातीला पीएमआरडीएकडून खासगी संस्थेला चालविण्यास देण्याचे नियोजन होते. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पीएमआरडीए प्रशासनानेच हे प्रदर्शन केंद्र चालविण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार, गेल्या दीड वर्षामध्ये या जागेत फक्त 5 प्रदर्शन झाले आहेत. 2022 मध्ये प्रदर्शन केंद्राच्या जागेत 14 ते 31 मार्च आणि 5 ते 22 डिसेंबर या कालावधीत अनुक्रमे दोन प्रदर्शन भरविण्यात आले. या प्रदर्शनांच्या माध्यमातून पीएमआरडीएला भाडेरकमेपोटी 1 कोटी 14 लाख 51 हजार 234 रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर, 2023 मध्ये आतापर्यंत तीन प्रदर्शन झाले आहेत. 12 ते 15 जानेवारी, 6 ते 12 फेब्रुवारी आणि 25 मे ते 8 जून या कालावधीसाठी भाडेरक्कम आकारुन केंद्राची जागा वापरण्यास देण्यात आली. त्या माध्यमातून एकूण 42 लाख 82 हजार 944 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT