वडगाव मावळ : गणेश विनोदे : कर्नाटकमधील गावातही घराघरांत शिवजयंती साजरी व्हावी, या उद्देशाने मावळ तालुक्यात वास्तव्यास असणार्या काही शिवप्रेमींनी मावळातून थेट कर्नाटकमधील त्यांच्या तुगाव (हा.) या गावी सुमारे 400 मूर्ती व भगवे झेंडे नेले आहेत.
त्यासोबतच तेथील प्रत्येक घरी वाटप करण्याचा अनोखा उपक्रम केला.शनिवारी (19 फेब्रुवारी ) सर्वत्र शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे.
'शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात' या संकल्पनेतून आपल्या मूळ गावीही शिवजयंती उत्साहात साजरी व्हावी या उद्देशाने मावळ तालुक्यात वास्तव्यास असणार्या कर्नाटकमधील काही शिवप्रेमींनी हा उपक्रम राबविण्याचा संकल्प केला होता.
लक्ष्मण बगदुरे व भीम डोंगरे यांच्या संकल्पनेतून तसेच संग्राम पिरसट्टे व मारोती घोरवाडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला असून यासाठी मावळ तालुक्यातील तळेगांव दाभाडे येथून छत्रपती शिवरायांच्या 400 मूर्ती व 450 झेंडे कर्नाटकमधील भालकी तालुक्यातील तुगांव(हा.) येथे नेण्यात आल्या.
या उपक्रमासाठी सुमारे 70 हजार रुपये खर्च आला असून यासाठी शिवाजी आडबळे गुरुजी, संजीव गाजरे, संदीप पाटील, राम डोंगरे यांच्यासह अनेक नागरिक व तरुणांनी सहकार्य केले आहे. दरम्यान या अनोख्या उपक्रमामुळे कर्नाटक मधील तुगाव या गावात घराघरात शिवजयंती साजरी होणार आहे.