वेल्हे : राज्यातील अतिमागास व अतिदुर्गम वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची जवळपास 40 टक्के पदे रिक्त आहेत. त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला असून, नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान सुरू आहे. तालुक्यातील शाळांमध्ये 397 शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र, प्रत्यक्षात 239 शिक्षकच आहेत. त्यामुळे एकशिक्षकी शाळांची संख्या वाढली आहे. तालुक्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वर्षानुवर्षे कमी होत आहे. 143 शाळांमध्ये तीन हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरम्यान, गेल्या वर्षी शिक्षकांची 90 पदे रिक्त होती.
नुकत्याच झालेल्या शिक्षकांच्या बदल्यांमुळे रिक्त पदांची संख्या वाढली आहे. 96 शिक्षकांची बदली करण्यात आली. त्यातील 10 शिक्षकांची बदली तालुकाअंतर्गतच करण्यात आली. त्यामुळे शिक्षकांची 86 पदे रिक्त झाली, तर नवीन सात शिक्षक रुजू झाले आहेत. बदली धोरणाविरोधात 52 शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली आहे. यासह केंद्रप्रमुखाची 16 पदे मंजूर असून, त्यापैकी 12 रिक्त आहेत, तर तीन विस्तार अधिकार्यांपैकी एकच जण येथे अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अतिमागास वेल्हे तालुक्यात प्राथमिक शाळांना कोणी वाली नसल्याचे गंभीर चित्र पुढे आले आहे.
शिक्षकांची पदे रिक्त असल्याने शिक्षकांअभावी शाळा बंद पडू नये, यासाठी दुसर्या शाळांतील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे एकशिक्षकी शाळा वाढल्या आहेत. बहुतेक शाळा दुर्गम डोंगराळ भागात आहेत. शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शाळांची तपासणी करण्यात येत आहे.
– पोपट नलावडे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, वेल्हे