पुणे

पुणे शहरात 40 टक्के फुटपाथवर अतिक्रमणे

अमृता चौगुले

पुणे : रस्त्यावरची धूळ ही प्रदूषित वातावरणात मोठी भूमिका निभावत आहे. शहरात बाहेरून येणार्‍या जड वाहनांवर नियंत्रण नाही. फुटपाथ असलेले 40 टक्के रस्त्यांवर अतिक्रमण, अरुंद अन् खराब रस्ते, हे शहराच्या प्रदूषणात मोठी भर घालत आहेत, असा अहवाल ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (एआरएआय) या संस्थेने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाठविला आहे.
शहराच्या प्रदूषणात सहभागी असलेल्या घटकांवर एआरएआयच्या शास्त्रज्ञांनी अतिशय बारकाईने अभ्यास केला आहे. वाहनाच्या इंधन ज्वलनातील हरित वायू, त्यातील सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन, कार्बन मोनोऑक्साइड, सूक्ष्म धूलिकण (पीएम 10), अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम 2.5) या सह झोपडपट्ट्यांमधील इंधनाचा वाटा 4.5 टक्के, तर 85 टक्के वाहने कार्बन मोनोऑक्साइड उत्सर्जनासाठी जबाबदार आहेत. शहरातील जड वाहतुकीवर नियंत्रण नाही. अरुंद अन् खराब रस्ते तसेच 40 टक्के फुटपाथ अतिक्रमित झाल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.

हिवाळ्यात आढळले जास्त प्रदूषण
निरीक्षणासाठी वार्‍याची दिशा, वेग, सभोवतालचे तापमान, सापेक्ष आर्द्रता यांचा अभ्यास केला गेला. पुणे शहराच्या मॉडेलिंगसाठी मुख्य हवामान डेटाचा वापर करण्यात आला. सभोवतालच्या एकाग्रता पातळीसंदर्भात हिवाळी हंगाम गंभीर असल्याचे आढळले. प्रदूषणासाठी धूळ हे प्रमुख स्रोत असून, त्यानंतर मोबाईल व औद्योगिक स्रोतांचे पुण्यातील सर्व ग्रीडचे सरासरी योगदान आढळून आले.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी
पुण्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अपुरी असल्याने वैयक्तिक वाहनांचा वापरही वाढत आहे. त्यामुळे अंतर्गत रस्त्यांवरील धूळ तसेच वाहनांचे टेल पाईप उत्सर्जनात योगदान देतात, असा शेरा या अहवालात देण्यात आला आहे.

शहराबाहेर जाऊन इंधन भरण्याची वृत्ती वाढली…
इंधनाच्या कमी खर्चामुळे शहराबाहेर जाऊन वाहनांमध्ये इंधन भरण्याची प्रवृत्ती आहे. त्यामुळे जास्त वायुउर्त्सजन करणारे इंधन वापरले जात आहे. याबाबत नागरिकांचे प्रबोधन गरजेचे आहे. जुन्या व्यावसायिक वाहनांवर बंदी घातल्याने सर्वांत जास्त फायदा होईल. उत्सर्जन कमी झाल्याने सामाजिक, आर्थिक मूल्यांकन करणे सोपे जाईल. व्यावसायिक वाहनांत प्रवासाची लांबी याचाही विचार करणे गरजेचे आहे.

आम्ही वारंवार महापालिकेला पत्र पाठवून कळवत आहोत की, या शहरातील जड वाहनांसाठी काहीतरी नियमावली करा. कचरागाड्या झाकल्या पाहिजेत. परंतु, महापालिका ते काम करीत नाही. शहरात सिमेंट रस्ते खूप आहेत. तेथील धूळ मोठ्या प्रमाणावर तिथेच साचते. हे रस्ते तांत्रिक झाडूने झाडले पाहिजेत. सिमेंट रस्त्यावरची धूळ ही प्रदूषणात मोठे योगदान देत आहे. पाण्याचे स्प्रिंकलर चौकात लावण्याची पालिकेची योजना प्रभावी ठरणार नाही. सिमेंट रस्ते झाडणे हा प्रभावी उपाय आहे.
   – डॉ. उमेष कहाळेकर, पर्यावरणतज्ज्ञ, (सदस्य, पर्यावरण समिती, केंद्र सरकार)

अहवालात काय म्हटले आहे?
धूलिकणांचे प्रमाण 200 मायक्रो ग्रॅम प्रतिचौमी इतके आहे.
बांधकामांच्या ठिकाणांवर धूलिकणांचे प्रमाण 400 इतके आहे.
औद्योगिक साइटवर हे प्रमाण 500 इतके आहे.
बायपास नसल्यामुळे बाहेरील जड वाहतूक शहरातून प्रवास करणार्‍या वाहनांचे प्रमाण जास्त.
अरुंद रस्त्यांच्या मर्यादित क्षमतेमुळे मध्यवर्ती शहरात गर्दीची समस्या.
रस्त्याच्या पृष्ठभागाची खराब गुणवत्ता.
फुटपाथ असलेल्या 40 टक्के रत्स्त्यांवर अतिक्रमणे.
फेरीवाल्यांवर कोणतेही नियंत्रण नाही.
वन-वे, अवजड वाहनांवर निर्बंध नाही.
अत्यंत अपुरी पार्किंग सुविधा

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT