पुणे: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून विविध आयटीआय ट्रेडच्या ऑनलाइन प्रवेश नोंदणीला सुरुवात झाली असून दोनच दिवसात 4 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. येत्या 26 मेपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम भरता येणार आहे.
रोजगाराची संधी म्हणून आयटीआयकडे पाहिले जाते. पारंपरिक शिक्षणामुळे सध्या वाढत असलेली बेरोजगारी व नोकरीच्या कमी असलेल्या संधी यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा आयटीआय प्रवेशाकडे कल वाढत आहे. गतवर्षी इलेक्ट्रीशियनच्या अभ्यासक्रमांना राज्यातील विद्यार्थ्यांनी पसंती दिली होती. (Latest Pune News)
या पाठोपाठ ’फिटर’ ’वेल्डर’ मेकॅनिक डिझेल अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेतला होता. गतवर्षी पहिल्या यादीत गुणवंत विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रीशियन, मेकॅनिक डिझेल, फिटर, वेल्डर, वायरमन आदी अभ्यासक्रमांना पसंती दर्शवली होती. याबरोबरच संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट, मशिनिस्ट डिझेल, मोटर मॅकेनिक, इलेक्ट्रॉनिक्स मशिनिस्ट आदी अभ्यासक्रमांना विद्यार्थी प्राधान्य देत असल्याचे चित्र होते.
यावर्षी प्रवेशासाठी 419 शासकीय आयटीआय मध्ये 93 हजार व 588 अशासकीय आयटीआय 61 हजार अशा एकूण 1 लाख 54 हजार जागांवर प्रवेश होणार आहेत. एक वर्ष कालावधीचे 44 अभ्यासक्रम व दोन वर्ष कालावधीचे 36 अभ्यासक्रम असून प्रवेश अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहेत.
https://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे तसेच प्रवेशासंबंधीची सविस्तर माहिती, नियमावली आणि मार्गदर्शक पुस्तिका देखील तेथे उपलब्ध आहे. यानंतर प्रथम फेरीसाठी आपल्या पसंतीचे व्यवसाय व संस्था निवडण्यासाठी आवश्यक ते पर्याय सादर करता येणार आहे.
यासाठी ‘ऑप्शन फॉर्म’ भरण्यास 26 मे पासून सुरुवात होणार आहे. गेल्या दोन दिवसात 4 हजार 219 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी 2 हजार 932 जणांनी आपला अर्ज अंतिम केला आहे. तर यापैकी 2 हजार 631 विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरले आहे.
प्रवेश अर्ज भरल्यानंतर सर्वसाधारण गुणवत्ता जाहीर होईल यानंतर विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्यासाठी मुदत दिली जाणार असून त्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल. पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. यंदा दहावीचा निकाल लवकर जाहीर झाल्यामुळे नोंदणीची प्रक्रिया सुरु केली असून पुढील वेळापत्रक नंतर जाहीर केले जाणार आहे.