गावठी दारूसह ४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त Pudhari
पुणे

Pune News: गावठी दारूसह ४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

Otur News - ओतूर पोलिसांनी खुबी (ता. जुन्नर) येथे नाकाबंदी दरम्यान एका पिकअप टेम्पोसह गावठी दारू असा एकूण ४ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. १५) सकाळी १० वाजेच्या सुमारास करण्यात आली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे ओतूर पोलीस (Police) स्टेशन हद्दीतील खुबी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत कल्याण-अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर ओतूर पोलिसांनी २४ तास नाकाबंदी सुरू केली आहे. (Otur News in marathi)

दरम्यान बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास नाकाबंदी चालू असताना कल्याणकडून नगरच्या दिशेला जाणाऱ्या दूध वाहतुकीची बंदिस्त बॉडी असलेल्या पिकअप गाडीवर पोलिसांना संशय आला. त्यामुळे ओतूरचे पोलीस जवान संदीप भोते, सुभाष केदारी व इतर सहकारी यांनी गाडीची कसून तपासणी केली.

यावेळी गाडीमध्ये ट्यूबच्या फुग्यातून गावठी हातभट्टीची दारू वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. गाडीचा चालक दत्तात्रय काळे (वय ५०, रा. पिंपळवंडी, ता. जुन्नर) यास ओतूर पोलिसांनी वाहनासह ताब्यात घेतले आहे.

ही गावठी हातभट्टीची दारू तो यशवंत रढे व रमेश कारभळ, (दोघेही रा. सावरणे, ता. मुरबाड, जि. ठाणे) यांच्याकडून घेऊन आला होता आणि ही दारू तो सुभाष नवले (रा. पारगाव, ता. जुन्नर) यांच्याकडे विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे आरोपी विरोधात सरकारतर्फे फिर्यादी पोलीस जवान संदीप भोते यांनी दिलेल्या तक्रारीवरून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम ६५ (अ) (ई), ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेत गावठी हातभट्टीची दारूची किंमत रूपये १० हजार रुपये व पिकअप गाडीची किंमत ४ लाख ५० हजार असा एकूण ४ लाख ६० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांनी हस्तगत केला आहे. याबाबतचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बाळशिराम भवारी हे करीत आहेत.

ही कारवाई पुणे(Pune) ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली ओतूरचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक लहू थाटे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, पोलीस अंमलदार संदीप भोते, सुभाष केदारी, श्याम जायभाये, पोलीस हवालदार बाळशीराम भवारी, सुरेश गेंगजे यांनी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT