पुणे

तळेगाव दाभाडे : पाच महिन्यांत 4 कोटींची मालमत्ता करवसुली

अमृता चौगुले

तळेगाव दाभाडे : पुढारी वृत्तसेवा :  तळेगाव दाभाडे नगर परिषदेने मालमत्ता करवसुलीसाठी धडक मोहीम सुरू केली असून, गेल्या पाच महिन्यांत 3 कोटी 91 लाख 58 हजार रुपये वसुली झाली आहे. मात्र, पुढील सात महिन्यांत 90 टक्के वसुली करण्याचे मोठे आव्हान असल्याचे करनिरीक्षक विजय शहाणे यांनी सांगितले.

थकबाकी वसुलीवर भर
मागील थकबाकी वसुलीसाठी कडक उपाययोजना करणार असल्याचे नगर परिषदेचे करवसुली अधिकार्‍याने सांगितले. मुख्याधिकारी एन. के. पाटील आणि उपमुख्याधिकारी ममता राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कर अधिकारी कल्याणी लाडे व करनिरीक्षक विजय शहाणे यांनी या वसुली मोहिमेचे नियोजन केले आहे. मागील थकबाकी वसुलीसाठी कडक उपाययोजना करणार असल्याचे कर अधिकारी कल्याणी लाडे यांनी सांगितले.

वसुलीसाठी केले बारा विभाग
या वसुलीसाठी शहराचे बारा विभाग करण्यात आले असून, त्यासाठी स्वतंत्र अधिकारी वसुलीचे नियोजन करीत आहेत. सध्या शहरातील भाग क्रमांक 6 ते 12 मधील करदात्यांचे मालमत्तेची बिले वाटपाचे काम वेगाने सुरू आहेत. येत्या 15 सप्टेंबरपूर्वी शहरातील सर्व विभागातील मालमत्तांच्या बिलांचे वाटप पूर्ण होतील, असे कर अधिकारी कल्याणी लाडे यांनी सांगितले.

तळेगाव शहरात 37 हजार मालमत्ता असून 39 कोटी 47 लाख 71 हजार रुपयांची वसुली करायची आहे. यामध्ये जवळजवळ 18 कोटी 74 लाख रुपयांची निव्वळ थकबाकी आहे. यावर्षी प्राधान्याने ही थकबाकी वसुलीसाठी कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत.
                                                     – कल्याणी लाडे, वरिष्ठ कर अधिकारी

शहरातील मालमत्तासाठी एकत्रीतकर, शिक्षणकर, रोजगार हमीकर, वृक्षकर, अग्निशमन कर, विशेष स्वच्छता कर, उपभोक्ता शुल्क, अनधिकृत बांधकामावरील कर आदी करांची वसुली केली जात आहे. एक एप्रिलपासून करवसुलीचे वर्ष सुरू झाले असून, गेल्या पाच महिन्यांत एकूण 3 कोटी 91 लाख 58 हजार रुपये वसुली झाली आहे. मात्र, पुढील सात महिन्यांत 90 टक्के वसुली करण्याचे मोठे आव्हान आहे.

                                                                 – विजय शहाणे, करनिरीक्षक

SCROLL FOR NEXT