पुणे; पुढारी वृत्तसेवा : बदललेली जीवनशैली, जंक फूडचे सेवन, व्यायामाचा अभाव यामुळे बहुतांश नागरिकांमध्ये स्थूलतेची समस्या बळावू लागली आहे. खासगी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात 25 वर्षे वयावरील 39 टक्के पुरुषांले स्थूलतेचा धोका आहे, असे निदर्शनास आले आहे.
इंडस हेल्थ प्लसतर्फे जून 2020 ते डिसेंबर 2022 या कालावधीत 12 हजार व्यक्तींचे निरीक्षण करण्यात आले. त्यावरून करण्यात आलेल्या अहवालात उच्च रक्तदाब, मधुमेह, स्थुलता याबाबत निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यानुसार, 25 वर्षांखालील 47 टक्के महिला आणि 39 टक्के पुरुष हे स्थूल आहेत. 17 टक्के महिलांना, 20 टक्के पुरुषांना मधुमेहाचा धोका आहे. पुण्यातील 40 टक्के महिलांना आणि 35 टक्के पुरुषांना 'एथेरोस्क्लेरोसिस'चा धोका असल्याचे नमूद केले आहे.
तरुणांमध्ये लठ्ठपणाचे उच्च प्रमाण दिसून येत आहे. खाण्याच्या सवयी, बैठेकाम करण्याची जीवनशैली यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेहाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. शारीरिक व्यायाम आणि आरोग्यदायी आहारामुळे लठ्ठपणाचा धोका कमी होऊ शकतो.
– अमोल नायकवडी, आरोग्य सेवा विशेषज्ञ