वडगाव मावळ: संत श्रीतुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमनाला येत्या 16 मार्च रोजी अर्थात तुकाराम बिजेच्या दिवशी 375 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने संत श्रीतुकाराम महाराज सदेह वैकुंठगमन त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा साजरा होत आहे.
या सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीत गाथा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला असून, श्रीतुकाराम महाराज संस्थान यांनी हा मान पुणे जिल्ह्यास दिला असल्याची माहिती श्रीक्षेत्र भंडारा डोंगर संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद आणि हभप ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
15 हजार भाविक वाचक म्हणून सहभागी होणार
श्रीक्षेत्र आळंदी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे अध्वर्यू हभप मारुतीबाबा कुर्हेकर महाराज आणि वारकरीरत्न हभप ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांच्या नेतृत्वाने गाथा पारायण सोहळा 9 ते 17 मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे.
भंडारा डोंगराच्या पायथ्याला हा सोहळा होईल. या पारायण सोहळ्यासाठी 15 हजार भाविक वाचक म्हणून सहभागी होणार असून, मुख्य सोहळा तुकाराम बिजेच्या दिवशी होणार आहे. या दिवशी राज्यभरातून सुमारे तीन लाख भाविक गाथा पारायण सोहळ्यात सहभागी होणार आहेत. जवळपास 100 एकर जागेवर हा सोहळा होणार आहे.
अयोध्यासारखे भंडारा डोंगरावरील संत श्रीतुकाराम महाराज यांचे मंदिर तयार होत आहे. श्रीरामासम तुकाराम असे मानून जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे कार्य सर्वांना परिचित व्हावे, यासाठी या मंदिराचे काम सुरू आहे. मंदिर उभारणीसाठी जवळपास 200 कोटी रुपये खर्च येत आहे.
अयोध्येच्या श्रीराम मंदिर उभारणीतीलच काही कारागीर भंडारा डोंगरावरील या मंदिरासाठीदेखील काम करत आहेत. या सोहळ्यामध्ये दररोज 5000 गाथा वाचक सहभागी होतील. रोज 1000 टाळकरी असतील. 25 मृदंगवादकांचा समावेश असेल.
कीर्तनसेवा 9 मार्च रोजी सकाळी 11 वाजता हभप रवींद्रमहाराज ढोरे आणि सायंकाळी सहा वाजता हभप मुकुंदकाका जाटदेवळेकर यांचे कीर्तन होणार आहे. तर, 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता हभप सागर महाराज शिर्के आणि सायंकाळी सहा वाजता हभप पोपट महाराज कासारखेडेकर यांचे कीर्तन होणार आहे.
11 मार्च रोजी सकाळी 11 वाजता हभप दशरथ महाराज मानकर आणि सायंकाळी सहा वाजता हभप एकनाथ महाराज सदगीर यांचे कीर्तन, 12 मार्च रोजी सकाळी 11 वाजता हभप शिरीष महाराज मोरे आणि सायंकाळी सहा वाजता हभप चंद्रशेखर महाराज देगलूरकर, 13 मार्च रोजी सकाळी 11 वाजता हभप चंद्रकांत महाराज वांजळे आणि सायंकाळी 6 वाजता हभप महादेव महाराज राऊत, 14 मार्च रोजी सकाळी 11 वाजता हभप नितीन महाराज काकडे आणि सायंकाळी 6 वाजता हभप बंडातात्या कराडकर, 15 मार्च रोजी सकाळी 11 वाजता हभप चैतन्य महाराज देगलूरकर आणि सायंकाळी 6 वाजता हभप रामभाऊ महाराज राऊत, 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता हभप ज्ञानेश्वर माऊली कदम आणि सायंकाळी 5 वाजता हभप जयवंत महाराज बोधले यांचे कीर्तन होणार आहे.
बिजेला तीन लाख मांडे होणार
श्रीतुकाराम बिजेच्या दिवशी तीन लाख मांडे केले जाणार आहेत. मुळशीतील विविध गावांमधून पाच लाख पुरणपोळीचा प्रसाद दिला जाणार आहे. एक लाख भाकरी आणि विविध भागांमध्ये केली जाणारी वेगवेगळ्या प्रकारची आमटी येथे अन्नदानात उपलब्ध असेल. सकाळी साडेनऊ ते अकरा या वेळेत वैकुंठ स्थानक, श्रीतुकाराम महाराजांचा वाडा, संस्थान देहू, भंडारा डोंगर संस्थान, भामचंद्र डोंगर येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार आहे.
दिंडी सोहळ्यात 375 धर्मध्वजधारी सहभागी होणार
या सोहळ्यानिमित्त 8 मार्च रोजी दुपारी तीन वाजता श्रीक्षेत्र भंडारा डोंगर येथे भव्य दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या दिंडीमध्ये 375 धर्मध्वजधारी, 375 कलशधारी, 375 तुळशीधारी, 375 कीर्तनकार, 375 टाळकरी, 375 मृदंगसेवक 375 ब्रह्मवीणाधारी, 375 चोपदार यांचा समावेश असेल. दिंडीमध्ये पाच किलो चांदीच्या पादुका ठेवण्यात येणार आहेत. श्रीक्षेत्र देहू येथून भंडारा डोंगरापर्यंत ही दिंडी निघणार आहे. तेथे पादुकांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
तुकाराम बिजेच्या दिवशी (दि. 16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.