पुणे: राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षी राज्यभरात नोंदवलेल्या एकूण क्षयरुग्णांपैकी 36 टक्के रुग्ण हे फुप्फुसांच्या बाहेरील क्षयरोगाचे (एक्स्ट्रापल्मोनरी टीबी) होते. साधारणपणे, मायक्रोबॅक्टेरियम क्षयरोगाचा फुप्फुस आणि श्वसनसंस्थेवर सर्वाधिक परिणाम होतो. काही रुग्णांमध्ये शरीराच्या इतर भागांवर सर्वाधिक परिणाम होतो. राज्यात एकूण क्षयरुग्णांपैकी एकतृतीयांशपेक्षा जास्त रुग्ण फुप्फुसांबाहेरील क्षयरोगाचे असल्याचे समोर आले आहे.
लिम्फ नोड क्षयरोग, हाड आणि सांध्यांचा क्षयरोग आणि जननेंद्रियाचा क्षयरोग असे क्षयरोगाचे विविध प्रकार आढळतात. फुफ्फुसांबाहेरील क्षयरोगाची लक्षणे सामान्य क्षयरोगासारखी नसतात. वेळेत निदान न झाल्यास क्षयरोगामुळे होणार्या मृत्यूचे प्रमाण खूप जास्त असू शकते. 2024 मध्ये 2.30 लाख क्षयरोग रुग्णांपैकी 36 टक्के रुग्ण हे दुसर्या प्रकारचे क्षयरुग्ण होते.
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसंचालक (क्षयरोग आणि कुष्ठरोग) डॉ. संदीप सांगळे म्हणाले, या अवस्थेचे निदान करणे अत्यंत आव्हानात्मक असते. अशा प्रकरणांमध्ये लक्षणे पारंपरिक क्षयरुग्णांपेक्षा पूर्णपणे वेगळी असतात. आरोग्य विभागाच्या टीमने 82 हजारांहून अधिक रुग्णांना सूचित केले आहे.
फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. महावीर मोदी म्हणाले, ईपीटीबीच्या बाबतीत चुकीचे निदान हे एक मोठे आव्हान आहे. ‘ईपीटीबी’मधील लक्षणे खोकला, वजन कमी होणे किंवा ताप यासारख्या टीबीच्या शास्त्रीयद़ृष्ट्या ज्ञात लक्षणांशी संबंधित नसतात. रुग्ण शोधून न काढल्यास आणि उपचार न केल्यास मृत्यू ओढवू शकतो.