पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाविद्यालयांमधील त्रुटींची पूर्तता करण्याचे दरवर्षी बंधपत्राद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला सांगणार्या; मात्र कोणत्याही प्रकारची कार्यवाही न करणार्या साधारण 350 महाविद्यालयांची संलग्नता धोक्यात आली आहे. या महाविद्यालयांची संलग्नता काढण्यासाठी पुणे विद्यापीठाकडून तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे.
पुणे विद्यापीठाच्या अॅकॅडेमिक कौन्सिलची बैठक शुक्रवारी झाली. या बैठकीत महाविद्यालयांना संलग्नता देण्याच्या प्रक्रियेबाबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर या सर्व विषयांवर अभ्यास करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. येत्या आठवड्यात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी समितीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
पुणे विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे पुणे, नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांत आहेत. शैक्षणिक वर्षाची सुरुवात होण्यापूर्वी पुणे जिल्ह्यातील साधारण 350 महाविद्यालये ही दरवर्षी संलग्नता घेतात. ही संलग्नता घेण्यासाठी त्यांना 500 रुपयांच्या बंधपत्रावर महाविद्यालयांमध्ये प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांची पदे भरण्यासोबतच शैक्षणिक आणि पायाभूत सुविधा सहा महिन्यांत पुरविण्याचे लिहून देण्यात येते.
मात्र, प्रत्यक्षात याबाबत कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे या महाविद्यालयांबाबत विद्यापीठाने कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. गरज भासल्यास या महाविद्यालयांची संलग्नता काढून टाकण्यात येईल. या संपूर्ण महाविद्यालयांचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे, अशी माहिती अॅकॅडेमिक कौन्सिलच्या सदस्यांनी दिली.
हेही वाचा