पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घराचे स्वप्न साकारले असून, दोन कोटी घरांचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी राज्यात आपण पंतप्रधान आवास योजना (शहरी) राबविणार आहे. पुणे विभागात साधारण पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर व पुणे ग्रामीणमध्ये मिळून 35 हजार घरांच्या उभारणीचा कार्यक्रम आम्ही हाती घेतला असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. योजनेतील घर खरेदीस पात्र होण्याकरिता वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे, असेही त्यांनी सांगितले.
साखर संकुलात सोमवारी (दि. 21) झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, पंतप्रधान आवास योजनेसाठी (शहरी) आम्ही वेगवेगळ्या भागांत जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यावर जिल्हाधिकार्यांशी माझे बोलणे झाले आहे. या योजनेअंतर्गत येणार्या घरांचे बांधकाम हे मोनोलिथिक कन्स्ट्रक्शन वुईथ अॅल्युमिनियम शटरी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भूकंपरोधक असणार आहे. त्याचे जीवनमान हे 80 वर्षे राहणार आहे.
लाभार्थी कुटुंबामध्ये पती, पत्नी, अविवाहित 18 वर्षांखालील मुले-मुली अशा पद्धतीने योजनेच्या अटी व शर्ती आहेत. योजनेतील घर खरेदीस पात्र होण्याकरिता वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे.
योजनेमध्ये अडीच लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होईल. यामध्ये बांधकाम कामगार असतील तर बांधकाम महामंडळातून त्यांना दोन लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होईल. घरांचे अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानामध्ये सोलर सिस्टिम आणि ग्रीन मानके, यासाठी अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय घेतल्याचे ते म्हणाले.
योजनेत घर खरेदी करताना मुद्रांक शुल्क एक हजार रुपये लावणार आहोत. योजनेअंतर्गत उभारण्यात येणारे प्रकल्प हे कामगारांना नोकरी- धंद्याच्या ठिकाणी सहज पोहचता येईल, यादृष्टीने जागा निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये बावधन, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुण्यातही चार-पाच ठिकाणी जागा निवडल्या आहेत.
शहरात आयटी, ऑटो क्षेत्र, ऑटो हब व अन्य उद्योग आपल्याकडे आहेत. अशा लोकांकडे काम करणारे ड्रायव्हर, धुणी-भांडी करणारे, जेवण बनविणारे कूक यांचा विचार गृहप्रकल्पात कुठेच होत नाही.
अशा तीन लाख रुपयांच्या आत उत्पन्न असणार्या वर्गातील कामगारांसाठी 30 ते 35 हजार घरकुलांचा प्रकल्प हाती घेत आहोत. त्याला निश्चित चांगला प्रतिसाद मिळेल आणि जागेची उपलब्धता राज्य सरकारच्या वतीने करण्यात आल्याचे ते म्हणाले. या घरांची किंमत थोडी जास्त राहील. तळमजला अधिक तीन मजले नाही, तर अधिक उंचीची घरे असतील. घराची कर्ज रक्कम हप्त्याने फेडता येईल.