सुरेश वाणी
नारायणगाव: सध्या गावोगावच्या यात्रा-जत्रांना सुरुवात झाली असल्याने तमाशा पंढरी अशी राज्यात ओळख असलेल्या नारायणगावमध्ये (ता. जुन्नर) यात्रा कमिटी व गावकारभार्यांची वर्दळ वाढली आहे. सध्या जवळपास 35 लोकप्रिय तमाशा मंडळांच्या फडमालकांच्या राहुट्या नारायणगावात उभ्या राहिल्या आहेत. तमाशाची बारी (सुपारी) ठरवण्यासाठी करार केले जात आहेत.
राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त तमाशा सम्राज्ञी दिवंगत विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांची नारायणगाव ही जन्मभूमी आहे. त्यामुळे नारायणगावची विशेष ओळख आहे. नारायणगाव हे तमाशाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी या ठिकाणी यात्रा-जत्रांच्या हंगामात नारायणगाव तमाशा मंडळांच्या फडमालकांच्या कार्यालयांनी गजबजून जाते. यंदा देखील गेल्या महिन्यापासून विविध लोकप्रिय तमाशा फडमालकांच्या राहुट्या नारायणगावमध्ये लागल्या आहेत.
जवळपास 35 तमाशा मंडळांच्या राहुट्या आहेत. यामध्ये काळू-बाळू, भिका-भीमा सांगवीकर, अंजली नाशिककर, मंगला बनसोडे, विठाबाई नारायणगावकर, मालती इनामदार, पांडुरंग मुळे, आशा खिलारे बारामतीकर, रेखा-सविता नगरकर, राधा-राणी पुणेकर, दीपाली-सुरेखा पुणेकर, वामन पाटोळे, शिवानी बोरगावकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, संध्या माने सोलापूरकर आदींचा समावेश आहे.
ग्रामपंचायतीकडून सोयीसुविधा उपलब्ध
फड मालकांच्या राहुट्यांना विजेचा पुरवठा तसेच पिण्याच्या पाण्याची सोय नारायणगाव ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिली आहे. उपसरपंच बाबू पाटे, संतोष खैरे व अन्य पदाधिकार्यांनी विशेष काळजी घेतली आहे. या राहुट्या पाडव्यापर्यंत राहणार आहेत. पाडव्याच्या दिवशी बुकिंग मोठ्या प्रमाणात होत असते. तर अक्षय तृतीयेला नारायणगावची यात्रा झाली की फड मालक राहुट्या काढून नेतात.
बुकिंग वाढले
कोरोनाचा काळ वगळता तमाशा फड मालकांना काहीसे चांगले दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या यात्रा-जत्रांचा हंगाम जोरदार सुरू झाल्याने तमाशाचे बुकिंग देखील वाढले आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून यात्रा कमिटी या ठिकाणी तमाशाची बारी ठरवायला येत आहेत. जी गावे मोठी आहेत, त्या गावांमध्ये मोठा तमाशा ठरवला जात आहे. केवळ रंगबाजी, गण-गौळण, बतावणी व काही निवडक गाणी असाच कार्यक्रम होतो, असे नाही तर दुसर्या दिवशी सकाळी हजेरीचा कार्यक्रम देखील ठेवला जात आहे. यात्रेच्या दुसर्या दिवशी हजेरी ठेवायची असेल, तर यात्रा कमिटीला जास्त पैसे मोजावे लागत आहेत. तसेच ज्या तमाशामध्ये मुली व महिला कलाकार जास्त त्या फडालाही जास्त मागणी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
यंदा तमाशाची बारी महागली
तमाशाची बारी ठरवायला विविध गावचे कारभारी, यात्रा कमिटी पदाधिकारी या ठिकाणी येत असतात. महागाई वाढत चालल्याने यंदा तमाशाची बारी काही प्रमाणात महाग झाल्याचे पाहायला मिळत आहे. कलाकारांचा पगार, डिझेल-पेट्रोलचे वाढलेले दर, टोलनाका आदी खर्च अधिक प्रमाणात होतो. त्यामुळे तमाशाची सुपारी दीड लाखापासून ते 3 लाख रुपयांपर्यंत आहे. सकाळी हजेरी करायची असेल, तर मात्र गावच्या यात्राप्रमुखांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
तमाशाची बारी एखाद्या गावात तिकिटावर करीत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रामुख्याने पोलिसांची परवानगी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे फड मालकांचे नुकसान होते. परिणामी, तमाशातील 70 ते 80 कलाकारांनाही आर्थिक फटका बसतो. शासनाने याबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा आहे. तसेच तमाशाच्या सीझनमध्ये एकदाच एका खिडकीवर सर्व परवानग्या एकाच वेळेस मिळाव्यात.- मोहित नारायणगावकर, तमाशा फड मालक