पुणे

पुणे शहरात गोवर 35, रुबेलाचे 2 रुग्ण

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहरात मंगळवारी गोवरचे 15 व बुधवारी 9 गोवरचे रुग्ण आणि 2 रुबेलाच्या रुग्णांची नोंद झाली आहे. यावर्षीच्या गोवरची रुग्णसंख्या 35 वर गेली असून, यामध्ये 24 वर्षीय महिला रुग्णाचाही समावेश आहे. रुबेलाचा एक रुग्ण कोथरूड, तर दुसरा खराडीतील आहे. यावर्षी शहरात रुबेलाचे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच घटना आहे. दोन मुलांची चाचणी पॉझिटिव्ह आली असून, एक कोथरूडचा आणि दुसरा खराडीचा आहे. कोथरूडमधील 12 वर्षांच्या मुलाची लसीकरण स्थिती सध्या अस्पष्ट आहे. खराडी येथील 11 महिने वयाच्या मुलाने गोवर-रुबेला लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत.

मंगळवारी आढळलेल्या 15 नवीन गोवर रुग्णांपैकी 12 महिला आहेत. रुग्ण 11 महिने ते 24 वर्षे वयोगटातील आहेत. एकूण 15 रुग्णांपैकी 8 रुग्ण पाच वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. गोवरचे भवानी पेठेत 5 रुग्ण, हडपसरमध्ये 2 रुग्ण; तर ताडीवाला रस्ता, मंगळवार पेठ, कोंढवा, वानवडी, कोंढवा बुद्रुक, कात्रज, येरवडा, बिबवेवाडी या परिसरांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. गोवरची लक्षणे
'फीवर विथ रॅश' हे गोवरचे प्रमुख लक्षण आहे. गोवरमध्ये 9 दिवस आजार राहतो.

पहिले तीन, मधले तीन आणि शेवटचे तीन असे तीन टप्पे दिसतात. पहिले तीन दिवस सर्दी, खोकला, ताप, डोळे लाल होतात. चौथ्या दिवशी अंगावर पुरळ येतात आणि कानामागून पुरळ यायला सुरुवात होते. संपूर्ण चेहर्‍यावर, छातीवर, पोटावर, मांडीवर, पायावर असे वरून खाली पसरते. पुरळ तीन-चार दिवस राहतात.

शेवटचे तीन दिवस पुरळ नाहीसे व्हायला लागतात. पुरळाच्या ठिकाणी फिकट तपकिरी रंगाचे डाग राहतात. पुरळ गेल्यावर तापही जातो. ताप नंतरही कायम राहिला अथवा ताप गेल्यावर पुन्हा आला तर धोक्याची लक्षणे मानली जातात. दम लागत असल्यास न्यूमोनियाची तपासणी केली जाते.

रुबेलाची लक्षणे
रुबेला आणि गोवर यांची लक्षणे बर्‍यापैकी सारखी आहेत. रुबेलाचा आजार तीन दिवस टिकतो. सौम्य पुरळ येणे, डोक्याच्या मागच्या बाजूला, मानेच्या वरच्या बाजूला गाठी येतात. ताप, पुरळ तीन दिवसांत जाते. गर्भवती स्त्रियांना पहिल्या तीन महिन्यांत रुबेलाचा आजार झाल्यास गर्भाच्या श्रवणक्षमतेवर परिणाम, डोक्याचा आकार कमी असणे, मोतीबिंदू, हृदयाला धोका, अशी शक्यता असते. घरात लहान मुलाला रुबेला झाल्यास गर्भवती आईकडे संक्रमित होऊ शकतो.

लसीकरण हा गोवर आणि रुबेलावरील प्रतिबंधक उपाय आहे. त्यामुळे लहान मुलांना वयाच्या दोन वर्षांच्या आत एमआरची लस द्यावी. पहिला डोस 9 ते 12 महिने आणि 16 ते 24 महिन्यांमध्ये दुसरा डोस दिल्यास मुलांना चांगले संरक्षण मिळते. कुपोषित मुलांमध्ये गोवरचा आजार त्रासदायक असतो. दंडाचा घेर साडेअकरा सेंटिमीटरहून कमी असल्यास तीव्र कुपोषित मानले जाते. गोवर होऊन गेल्यावर कुपोषित मुलांमध्ये तीव्र स्वरूपाचा न्यूमोनिया होऊ शकतो. घशातील स्रवाचे नमुने, रक्ताची तपासणी यातून गोवर आणि रुबेलाचे निदान केले जाते. गोवर आणि रुबेलाच्या अँटीबॉडी वेगवेगळ्या असतात. एमआर लस न मिळाल्यास दोन्ही आजारांची शक्यता वाढते.

            – डॉ. प्रमोद जोग, सदस्य, गोवर प्रतिबंधक राज्यस्तरीय टास्क फोर्स

एनआयव्हीच्या मुंबईतील क्षेत्रीय कार्यालयातून आणखी 24 गोवर रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले आहेत. यावर्षी प्रथमच रुबेलाचे दोन रुग्ण सापडले आहेत. रुबेला आणि गोवरच्या प्रतिबंधासाठी तातडीने पावले उचलली जात आहेत.

                                                    – डॉ. आशिष भारती, आरोग्यप्रमुख

SCROLL FOR NEXT