पुणे; पुढारी वृत्तसेवा : खडकवासला ते इंदापूरपर्यंत असलेल्या नवीन मुठा उजवा कालव्याची गळती रोखणे, मजबुतीकरण, कालव्यातील राडारोडा काढणे या कामांसाठी आतापर्यंत 35 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या उपाययोजना केल्यामुळे कालव्याची वहनक्षमता वाढल्याचा दावा जलसंपदा विभागाकडून करण्यात आला आहे. याचा फायदा शहरभागासह लगतच्या गावांना झाला आहे.
खडकवासला ते इंदापूरपर्यंत 202 किलोमीटर लांबीचा मुठा उजवा नवीन कालवा आहे.
या कालव्याचे काम 1960 मध्ये पूर्ण झाले. खडकवासला ते फुरसुंगीपर्यंत 29 किलोमीटर लांबीचा हा कालवा आहे. शहरातील धायरी, नांदेड, जनता वसाहत, लष्कर छावणी भाग, हडपसर या भागांसह पुढे फुरसुंगी, लोणी काळभोर या भागांतून पुढे दौंड आणि शेवटी इंदापूरला हा कालवा पोहचतो. हा कालवा 2018 मध्ये दांडेकर पूल परिसरात फुटला होता. या पार्श्वभूमीवर दरवर्षी कालव्याची पाहणी करून देखभाल-दुरुस्ती केली जाते. या कालव्याच्या शहरी भागात अजूनही 40 टक्के पाणीगळती होत होती. ती रोखण्यासाठी कामे सुरू होती. हा कालवा कायमच वाहता असल्यामुळे त्याच्या दुरुस्तीच्या कामात अडचणी येत होत्या.
या कालव्याची एक हजार क्युसेक वहनक्षमता आहे. कालव्यालगत अतिक्रमणे झाल्याने त्यात कचरा, राडारोडा सातत्याने टाकण्यात येतो. तसेच कालव्याचे भराव सैल झाले आहेत. त्याचप्रमाणे कालव्याखालून पाण्याची सुमारे 40 टक्के गळती होत असल्यामुळे शेवटपर्यंत म्हणजेच इंदापूरपर्यंत कमी पाणी पोहचते. गेल्या काही वर्षांपासून या कालव्याची दुरुस्ती, अस्तरीकरण तसेच मजबुतीकरण करण्यात आलेले नाही. त्यामुळे कालव्यास भेगा पडल्या आहेत.
या भेगा उंदीर, घुशी यांनी आणखी मोठ्या केल्या. त्यामुळे कालव्यातून शेतीसाठी पाणी सोडल्यानंतर या छिद्रांमध्ये पाणी जात होते. त्यामुळे गळती, प्रसंगी मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून कालवा फुटणे अशा घटना वारंवार होत आहेत. त्यातच या कालव्यातून कायमच शेतीसाठी पाणी सोडण्यात येत असल्याने या कालव्यात ओलावा असतो. त्यामुळे भरावाचे काम केले तरी खालच्या भागात ओलावा असल्याने दुरुस्तीनंतर हा भाग चांगला सुकत नाही, तोपर्यंत संबधित भागातील गळती थांबत नसल्याचे जलसंपदा विभागाचे निरीक्षण आहे.
'कालव्याच्या भरावाची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. फुरसुंगी (देशमुख मळा) तसेच खडकवासला, धायरी, जनता वसाहत ते शिंदेवस्तीपर्यंत भागापर्यंत कालव्याच्या दुरुस्तीची कामे केली आहेत. या कामासाठी सुमारे 37 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी आतापर्यंत 35 कोटींची कामे पूर्ण झाली आहेत,' अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांनी दिली.