पुणे; पुढारी वृत्तसेवा: बिबवेवाडी परिसरातील एका व्यावसायिकाच्या घरातून 1 किलो सोने, तीन किलो चांदी आणि रोकड असा तब्बल 32 लाख रुपयांचा ऐवज चोरी करणार्या सराईत चोरट्याला, गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने कोंढव्यातील खडीमशीन चौकातून अटक केली. नवीन खरेदी केलेले श्वानाचे पिल्लू आणण्यासाठी कोथरूड येथे गेले असता, चोरट्याने पाठीमागे व्यापार्याच्या घरात हात साफ केला होता. मुश्तफा ऊर्फ बोना ऊर्फ पाटी शकिल अन्सारी (वय 34, रा. ग्रीन पार्कशेजारी सर्व्हे नं. 42, कोंढवा) असे त्याचे नाव आहे. अन्सारी हा रेकॉर्डवरील सराईत चोरटा असून, भरदिवसा घरफोडी करण्यात तो पटाईत आहे.
व्यापार्याच्या घरातील चोरीची घटना मागील दहा दिवसांपूर्वी सवेरा अपार्टमेंट डी विंग बिबवेवाडी येथे सोमवारी दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी प्रवीण रमेश कांडपिळे (वय 48, रा. सवेरा अपार्टमेंट) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दाखल गुन्ह्यांच्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट-1 चे पथक समांतर तपास करीत होते. पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांना ही घरफोडी मुस्तफा अन्सरी याने केल्याची माहिती मिळाली. मात्र, तो कोण आहे, हे माहीत नव्हते. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेर्यांची पाहणी केली असता, चोरट्याच्या हालचालींवरून पोलिस कर्मचारी अमोल पवार, अजय थोरात आणि इम्रान शेख यांना त्याची माहिती मिळाली.
2012 मध्ये त्याला एका घरफोडीत पवार यांनी पकडले होते. त्या वेळी त्याने ती घरफोडी टेरेसवरून खाली उतरून बाथरूमच्या काचा काढून केली होती. पवार यांना ही चोरी बोना ऊर्फ पाटी याने केल्याचा संशय आला. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, कर्मचारी तुषार माळवदकर, नीलेश साबळे, अय्याज दड्डीकर यांच्या पथकाने त्याच्यावर पाळत ठेवण्यास सुरुवात केली. बोना ऊर्फ पाटी शनिवारी खडीमशिन चौकात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने त्याला पकडले. चौकशीत त्याने घरफोडीची कबुली दिली. बोना ऊर्फ पाटी हा सराईत गुन्हेगार आहे.
तो भरदिवसा घरफोडी करण्यात तरबेज आहे. तो कधीच समोरचा दरवाजा तोडून घरात चोरी करीत नाही. एकतर टेरेसवरून तो खाली गॅलरीत उतरतो किंवा घराचा पाठीमागील दरवाजा, खिडकी तोडून आत प्रवेश करून चोरी करतो, अशी माहिती पोलिसांना दिली. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.