पुणे : पुढारी वृत्तसेवा : गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यक्तीची 36 लाख 65 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या कंपनीच्या मालकासह कार्यालयातील कर्मचार्यांच्या विरोधात बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेलवाकुमार नडार (रा. कोंढवा) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या प्राथमिक चौकशीत याप्रकारे एकूण 200 जणांची तब्बल 300 कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
याबाबत सचिन पुरुषोत्तम पवार (38, रा. वाघोली) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट 2020 ते नोव्हेंबर 2022 दरम्यान घडला. गुन्हा दाखल झाल्यापासून अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटचा मालक नडार हा फरारी आहे. कॅम्प भागात त्याचे कार्यालय होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे हडपसर भागातील एका कंपनीत व्यवस्थापक म्हणून कामाला आहेत. त्यांनी 2018 मध्ये 9.50 टक्के दराने 6 लाखांचे वाहन कर्ज आणि 13 टक्के दराने 6 लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते.
त्याचे हफ्ते ते नियमितपणे भरत होते. या दरम्यान त्यांना अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटमधील प्रतिनिधीचा फोन आला. तुम्हाला आम्ही कमी टक्क्याने म्हणजेच 6 ते 7 टक्के दराने कर्ज उपलब्ध करून देऊ किंवा तुमचे चालू असलेले लोन आमच्या माध्यमातून भरू, असे सांगितले. तसेच, आमची कंपनी इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करत असून त्यातून आलेल्या नफ्यातून कर्जदारांना हप्त्याच्या स्वरूपात पैसे देते, असे सांगण्यात आले. यावर पवार यांनी विश्वास ठेवला.
त्यानुसार कंपनीने ऑगस्ट 2020 मध्ये पवार यांच्याकडून आवश्यक त्या कागदपत्रांवर सह्या घेऊन त्यांच्या नावे 6 वेगवेगळ्या बँकेतून 47 लाख 93 हजारांचे वैयक्तिक कर्ज मंजूर करून घेतले. यातील 40 लाख 89 हजार रुपये अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटमध्ये ठेवी स्वरूपात गुंतविले. यानंतर पवार यांच्या नावे कर्ज मंजूर केलेल्या 6 बँक खात्यातील 3 कर्जखाती बंद करण्यासाठी पुन्हा एका फायनान्स कंपनीकडून 15 लाख रुपये पर्सनल लोन घेतले. सुरुवातीला काही महिने अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटकडून त्यांच्या कर्जावरील हप्ते भरण्यात आले. मात्र, जानेवारी 2023 पासून थकीत कर्ज रक्कम 33 लाख 85 हजारांवरील कर्ज हप्ता भरण्यात आला नाही.
तसेच, एसआयपीच्या नावाखाली पवार यांनी 10 हजार प्रतिमहिना गुंतवणूक केलेली 2 लाख 80 हजारांची रक्कम परत न देता एकूण 36 लाख 65 हजारांची फसवणूक केली. पवार यांच्यासह तक्रार अर्ज प्राप्त झालेल्या आणखी 16 जणांची 7 कोटी 22 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने प्राथमिक तपास केला असता अशाप्रकारे एकूण 200 जणांची तब्बल 300 कोटींची फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
वाहन, गृहकर्ज घेतलेल्यांशीच संपर्क
कंपनीतील प्रतिनिधीमार्फत नागरिकांकडून पैसे घेऊन ते इक्विटी मार्केट, कमोडिटी मार्केटसह इतर ठिकाणी गुंतविले जायचे. यातून आलेल्या नफ्यातील काही हिस्सा मूळ गुंतवणूकदारांना दिला जायचा. किंवा त्यांचे हप्ते त्यातून फेडले जायचे. ज्या व्यक्तींनी वाहन, गृहकर्ज घेतलेले आहे, अशा व्यक्तींनाच अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटकडून संपर्क केला जात होता, असे तपासात समोर आले आहे.