Pune: जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर 2024 दरम्यान मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत एकूण 7 लाख 22 हजार 464 जणांनी मतदार नोंदणी केली. यात पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदार आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. जिल्ह्यात गेल्या 11 महिन्यांमध्ये 3 लाख 87 हजार 559 महिला मतदारांची वाढ झाल्याचे अंतिम मतदारयादीवरून स्पष्ट झाले आहे.
त्यातुलनेत पुरुष मतदारांची वाढ 3 लाख 34 हजार 902 इतकीच झाली आहे. महिलांची वाढ पुरुषांच्या तुलनेत 52 हजार 657 ने जास्त आहे. त्यामुळे या 11 महिन्यांत जिल्ह्याचे पुरुष महिला लिंग गुणोत्तर प्रमाणही 915 वरून 932 इतके सुधारले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार 23 जानेवारी रोजी जिल्ह्यात 42 लाख 44 हजार 314 पुरुष, 38 लाख 82 हजार 10 महिला, तर 695 तृतीयपंथी, असे एकूण 81 लाख 27 हजार 19 मतदार होते. तर, 4 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदानासाठी पात्र असणार्या मतदारांची याची प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 45 लाख 79 हजार 216 पुरुष, 42 लाख 69 हजार 569 महिला व 805 तृतीयपंथी मतदार आहेत.
महिला मतदारांमध्ये वाढ झाल्याने प्रति हजारी पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांचे प्रमाण ठरविणारे लिंग गुणोत्तर प्रमाण सुधारले आहे. जानेवारीत जिल्ह्यात प्रति एक हजार पुरुषांमागे 915 महिला होत्या, तर 30 ऑगस्टच्या यादीनुसार ते 925 इतके झाले व 4 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार हे प्रमाण सुधारून 932 इतके झाले आहे.
याच 11 महिन्यांच्या काळात 18 ते 19 या वयोगटातील नवमतदारांची संख्या 71 हजार 588 वरून 1 लाख 78 हजार 615 इतकी झाली आहे. यात 1 लाख 7 हजार 27 ने वाढ नोंदविण्यात आली आहे. तर, 20 ते 29 या वयोगटातील तरुण मतदारांची संख्या 13 लाख 5 हजार 974 वरून 15 लाख 61 हजार 354 इतकी झाली आहे. यात 2 लाख 55 हजार 380 ने वाढ झाली आहे.