पुणे

कात्रज दूध संघाला तीन कोटींचा नफा; दूध व दुग्धजन्य पदार्थांसाठी मार्केटिंगवर भर

Sanket Limkar

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघास गत वर्ष 2023-24 मध्ये सुमारे तीन कोटींचा नफा झाला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत त्यामध्ये भरीव वाढ झाल्याची माहिती संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी दिली. संघाच्या दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीमध्ये वाढ करण्यासाठी मार्केटिंगवर भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मार्केटींगवर भर

दूध उत्पादक शेतकर्‍यांना मागील वर्षात दूधफरकाची तरतूद नसताना व आर्थिक परिस्थिती नसताना देखील चालू वर्षाच्या उलाढालीतून प्रतिलिटर एक रुपयाप्रमाणे सुमारे 6 कोटी 50 लाख रुपये दूध उत्पादक शेतकर्‍यांना देऊन दिलासा देण्यात आला आहे. तसेच, शेतकर्‍यांना दूधबिले वेळेत दिली जात आहेत. संघाचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीमध्ये वाढ होण्यासाठी बाहेरील तज्ज्ञ मार्केटिंग सल्लागारांची नेमणूक केलेली आहे. त्यामुळे संघाच्या दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीमध्ये वाढ झाली आहे. संघातील कर्मचारी संघटनेचा त्रैवार्षिक करार करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक कर्मचार्‍याला एक वेतनवाढ देण्यात आलेली आहे. संघाने नव्याने कात्रज कुल्फी, कात्रज मस्तानी, चॉकलेट बर्फी व कात्रज टेट्रा पॅक दूध लाँच केल्याचे पासलकर यांनी सांगितले.

दूध पार्लर्समुळे प्रसिद्धि

संघाचे उपाध्यक्ष भाऊ देवाडे म्हणाले, संघाच्या दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी पार्लर अद्ययावत करण्यात आलेली आहेत. यामुळे विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील मोक्याच्या ठिकाणी नवीन गाळे विकत अथवा भाड्याने घेऊन संघाचे अद्ययावत विक्री पार्लर उभारण्याचा मानस आहे.

आता मुंबईतही मिळणार कात्रज दूध

मुंबई शहर व उपनगरांमध्ये मार्केटिंग एजन्सी नेमून दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीचे मोठे उद्दिष्ट ठेवून लाँचिंग करीत आहोत. त्यामुळे संघाच्या नफ्यात वाढ होणार आहे. संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये म्हणाले, शासनाच्या गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदानाचा फायदा दूध उत्पादक शेतकर्‍यांना जास्तीत जास्त मिळवून देण्यात आला आहे. त्यामध्ये तब्बल रक्कम रुपये दोन कोटींचे अनुदान संघाच्या दूध उत्पादक शेतकर्‍यांना मिळवून देण्यात आलेले आहे. दूध उत्पादक शेतकर्‍यांना इनपुट विभागामार्फत कडबा कुट्टी मशिन, मिल्किंग मशिन, मिनरल मिक्सचर, औषधे, बी-बियाणे आदींचा पुरवठा अनुदान तत्त्वावर केला जात आहे.

कात्रज पशुखाद्याची विक्री नऊशे टनांपर्यंत नेणार

संघाच्या पशुखाद्य कारखान्यातून उत्पादित होणार्‍या पशुखाद्याच्या गुणवत्तेमध्ये वाढ करून व मार्केटिंगवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पशुखाद्याच्या महिना 150 मेट्रिक टन इतकी असणारी विक्री वाढविण्यात आली असून, आता सुमारे 400 मेट्रिक टन इतकी विक्री झाली आहे. पुढे जाऊन 800 ते 900 मेट्रिक टनापर्यंत पशुखाद्य विक्रीचे उद्दिष्ट ठेवल्याचे नमूद करून पासलकर म्हणाले, आगामी काळामध्ये राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाच्या (एनडीडीबी) अर्थसाह्यातून डेअरी विस्तारीकरणाच्या मंजूर प्रकल्पाच्या कामाला गती देणार आहे. ज्याद्वारे संघाच्या नवीन अद्ययावत प्रकल्पाची उभारणी करणे व नवीन उत्पादने बाजारामध्ये आणण्याचा मानस आहे.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT