अपघात बातमी  पुढारी
पुणे

Pune: 'त्यांच्या' तत्परतेने मध्यरात्री रस्त्यावर तडफडणार्‍याला मिळाले जीवदान

या देवदूतांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे 29 वर्षीय अक्षय शंकर तिकोणे या तरुणाला नवजीवन मिळालेे

प्रसाद जगताप
  • आरटीओ महिला इन्स्पेक्टर रहिमा मुल्ला आणि त्यांच्या सहकार्‍यांची कामगिरी

  • गोल्डन अवरमध्ये वाचवला एका पादचार्‍याचा जीव

  • पुणे-मुंबई-पुणे महामार्ग 48 वरील घटना

पुणे : काळरात्र होती ती, एका पादचार्‍यासाठी...! पुणे-मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 वर मध्यरात्रीची भयाण शांतता पसरली होती. पण याच शांततेत एका निष्पाप जीवाचा श्वास थांबणार होता, जर ‘देवदूत’ बनुन वायुवेग पथकातील इन्स्पेक्टर रहिमा मुल्ला आणि त्यांचे सहकारी मदतीला धावले नसते तर...!

परिवहन विभागाच्या वायुवेग पथक क्रमांक 4 च्या प्रमुख महिला इन्स्पेक्टर रहिमा मुल्ला, सह इन्स्पेक्टर दत्तात्रय शिंदे आणि चालक शरद जगताप या देवदूतांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे 29 वर्षीय अक्षय शंकर तिकोणे या तरुणाला नवजीवन मिळालेे. गोल्डन अवरमध्ये मिळालेल्या तात्काळ उपचारांमुळे एक जीव वाचला आणि माणुसकीचे एक सुंदर उदाहरण समोर आले आहे.

काळरात्रीचे ते भयानक दृश्य...

मा. परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या निर्देशानुसार, पुणे-मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर अपघाताचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी मे 2025 मध्ये रात्र गस्तीची विशेष तपासणी मोहीम सुरू आहे. त्यामोहिमेनुसार दि. 10 मे 2025 रोजी रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत वायुवेग पथक क्रमांक 4 आपले कर्तव्य बजावत होते. या पथकात रहिमा हमजेखान मुल्ला (मोटार वाहन निरीक्षक), दत्तात्रय संगप्पा शिंदे (सहायक मोटार वाहन निरीक्षक), आणि शरद जगताप (वाहन चालक) यांचा समावेश होता. 11 मे रोजी रात्री 12.15 च्या सुमारास कान्हे फाटा येथे तपासणी करत असताना, पुणे येथून मुंबईकडे जाणार्‍या एका ट्रकने रस्ता ओलांडणार्‍या एका पादचार्‍याला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की पादचारी व्यक्ती ट्रकखाली गंभीर जखमी होऊन बेशुद्धावस्थेत पडली होती. डोक्यातून, कान आणि नाकातून रक्तस्राव होत होता, हात-पायही गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर ट्रकचालक तिथेच गाडी सोडून पसार झाला होता. त्या भयान अंधारात तो अपघात ग्रस्त तडफडत मदतीसाठी याचना करत होता. इतक्यात वायुवेग पथक 4 ला ही घटना दिसली, क्षणाचाही अवधी न घालवता हे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले अन सुरू झाले मदतकार्य...

पाच मिनिटांत धावून आली मदत...

अपघाताचं गांभीर्य लक्षात येताच, रहिमा मुल्ला यांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ रुग्णवाहिकेला पाचारण केलं. अवघ्या पाच मिनिटांत रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आणि जखमी अक्षयला तातडीने जवळच्या ’महावीर हॉस्पिटल, कामशेत’ येथे उपचारांसाठी पाठवण्यात आले. केवळ जीव वाचवला नाही, तर अपघातामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी देखील पथकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला घेऊन सुरळीत केली. त्यानंतर वडगाव मावळ पोलीस स्टेशनला अपघाताची माहिती देऊन अपघातग्रस्त वाहन पोलिसांच्या ताब्यात दिले

मृत्यूच्या दाढेतून परतलेला अक्षय....

महावीर हॉस्पिटलमध्ये प्रथमोपचार मिळाल्यानंतर अक्षय शंकर तिकोणे (वय 29, रा. पाटण, लोणावळा) शुद्धीवर आला. त्याची प्रकृती स्थिर असली तरी पायाची, हाताची, बरगड्याची आणि डोक्याची अशा काही शस्त्रक्रिया कराव्या लागणार असल्याने 14 मे रोजी त्याला ’हरणेश्वर हॉस्पिटल, तळेगाव दाभाडे’ येथे हलवण्यात आले. 22 मे रोजी वायुवेग पथकाने पुन्हा हरणेश्वर हॉस्पिटलला भेट दिली. तेव्हा अक्षय डॉक्टरांशी आणि त्याच्या आई-वडिलांशी व्यवस्थित बोलत असल्याचे पाहून सर्वांनाच आनंद झाला. डॉक्टरांनी त्याच्यावर झालेल्या यशस्वी शस्त्रक्रियांची माहिती दिली आणि अक्षयची प्रकृती आता पूर्णपणे ठीक असल्याचे रहिमा मुल्ला यांना सांगितले.

गोल्डन अवरची किमया... आम्ही तात्काळ रुग्णवाहिकेला बोलावले आणि जखमीला रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था केली. ’गोल्डन अवर’ मध्ये उपचार मिळाल्यानेच त्या व्यक्तीचा जीव वाचला, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आमचं कर्तव्य बजावल्याबद्दल त्या व्यक्तीच्या कुटुंबियांनी आणि डॉक्टरांनी आभार मानले, ही आमच्यासाठी समाधानाची गोष्ट आहे,
रहिमा हमजेखान मुल्ला, मोटार वाहन निरीक्षक, आरटीओ, पुणे
अशा गंभीर अपघातांमध्ये वेळेवर मदत मिळणे किती महत्त्वाचे असते हे या घटनेतून सिद्ध झाले आहे. वाहतूक सुरळीत करून पोलिसांच्या ताब्यात वाहन दिल्यानंतर आम्ही रुग्णालयात जाऊन पेशंटची विचारपूस केली आणि वरिष्ठांना माहिती दिली,
दत्तात्रय संगप्पा शिंदे, सहायक मोटार वाहन निरीक्षक, आरटीओ, पुणे
ही घटना केवळ एका अपघातातून जीव वाचल्याची नाही, तर वेळेवर मिळालेली मदत, कर्तव्यदक्षता आणि माणुसकीच्या जोरावर मृत्यूच्या दाढेतून एका जिवाला कसे परत आणता येते, याचे एक ज्वलंत उदाहरण आहे. मुंबई-पुणे महामार्गावर रात्रीच्या वेळी कर्तव्य बजावणार्‍या आमच्या अधिकार्‍यांचे आणि कर्मचार्‍यांचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यांच्या तत्परतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे एका कुटुंबाला पुन्हा एकदा आनंदाचे दिवस मिळाले आहेत.
अर्चना गायकवाड, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT