पुणे; पुढारी वृत्तसेवा : खरीप हंगामात स्थानिक नैसर्गिक आपत्तीअंतर्गत अतिवृष्टीमुळे पुणे जिल्ह्यात पिकांच्या झालेल्या नुकसानीपोटी कृषी विभाग, विमा कंपन्यांकडे शेतकर्यांकडून सूचना प्राप्त झाल्या. त्यांच्या पडताळणीनंतर 1 हजार 499 शेतकरी पात्र ठरले असून, नुकसानीची रक्कम 54 लाख 28 हजार 56 रुपये होते. त्यामुळे शेतकर्यांच्या बँक खात्यावर सुमारे 29 लाख रुपये जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष काटकर यांनी दिली.
पिकांच्या नुकसानीच्या एकूण 97 सूचना शेतकर्यांकडून प्राप्त झाल्या. त्यामध्ये उशिराने सूचना देणे, चुकीच्या 472 सूचना निघाल्या. तर 126 सूचनांमध्ये पिकांचे नुकसान झाल्याचे आढळून आले नाही. उर्वरित एक हजार 499 सूचनांन्वये नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले असून अशा शेतकर्यांना मदत देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
सद्य:स्थितीत 739 शेतकर्यांच्या बँक खात्यावर 28 लाख 94 हजार 333 रुपये जमा करण्यात आले असून, उर्वरित 760 शेतकर्यांच्या बँक खात्यावर 25 लाख 33 हजार 723 रुपयांइतकी नुकसानभरपाईची रक्कम जमा करण्याचे काम सुरू असल्याची माहिती प्रभारी कृषी उपसंचालक आणि तंत्र अधिकारी प्रमोद सावंत यांनी दिली.
ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे बाधित गावांची संख्या 1 हजार 325 इतकी असून 39 हजार 657 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे. तसेच बाधित शेतकरी संख्या 64 हजार 447 इतकी आहे. कोरडवाहू शेतीपीक नुकसानीसाठी हेक्टरी 13 हजार 600 रुपये, फळपिके सोडून बागायती बाधित क्षेत्रासाठी हेक्टरी 27 हजार रुपये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी हेक्टरी 36 हजार रुपयांइतकी आर्थिक मदत शासनाकडून केली जाते. तसेच भोर 8, वेल्हा 6 आणि मुळशी 8 मिळून 22 शेतकरी आर्थिक मदत मिळण्यास पात्र ठरले आहेत. त्यांची नुकसानभरपाई अंतिम करण्याचे काम सुरू आहे.
तालुकानिहाय मंजूर झालेली विम्याची रक्कम
मावळ 10,766, खेड 9,45,421, आंबेगाव 6,43,644, जुन्नर 12,41,725, शिरुर 1,01,155, पुरंदर 6,37,826, दौंड 83,853, बारामती 9,73,555, इंदापूर 7,90,111.