खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्यात शिंदेवाडी गावाला 'जलजीवन मिशन'अंतर्गत 27 कोटी रुपये मंजूर झाले असून, लवकरच या कामाची सुरुवात करण्यात येईल. हा निधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाला आहे. त्यामुळे इतर कोणी याबाबत काही सांगत असेल, तर त्यावर विश्वास ठेवू नका, असा सल्ला खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
शिंदेवाडी (ता. भोर) येथे बुधवारी (दि. 1) विविध विकासकामांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम तसेच रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आल्या होत्या. या वेळी झालेल्या सभेला त्या बोलत होत्या. या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रणजित शिवतरे, विक्रम खुटवड, चंद्रकांत बाठे, पीडीसीसी बँकेचे माजी संचालक भालचंद्र जगताप, माजी जिल्हा परिषद सदस्या शलाका कोंडे, माजी पंचायत समिती सदस्या पूनम पांगारे, गणेश खुटवड, अभिजित शिंदे, अरविंद शिंदे, प्रवीण शिंदे, अशोक गोगावले आदी उपस्थित होते.
गेल्या अनेक वर्षांपासून एका उद्योजकाने शेतकर्यांच्या शेतामध्ये सांडपाणी सोडले आहे. यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याचे सभेत उपस्थित महिलांनी निदर्शनास आणून दिले. या वेळी खासदार सुळे यांनी संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधून तत्काळ यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या, तसेच शिंदेवाडी ते गोगलवाडी रस्त्याच्या कामापैकी 700 मीटरचे काम गेल्या 3 वर्षांपासून ठप्प असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले. याबाबतही संबंधित अधिकार्यांशी संपर्क साधून राहिलेला रस्ता पूर्ण करण्याच्या सूचना सुळे यांनी दिल्या.
आधी काम, नंतरच सन्मान
सभेच्या ठिकाणी जात असतानाच स्थानिक पदाधिकर्यांनी खासदार सुळे यांचा सन्मान करण्यास सुरुवात केली. मात्र, आधी काम करूयात आणि नंतरच सन्मानाचे बघूयात, असे सुळे यांनी सुनावले.