पुणे: परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम (सीपीटीपी) अंतर्गत ‘सीपीटीपी 10’ या तुकडीअंतर्गत दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती झालेल्या 269 उमेदवारांना 2 एप्रिल 2025 पासून रुजू होण्याचे आदेश महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत देण्यात आले आहेत.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्यसेवा परीक्षा 2022 च्या अंतिम निकाल संवर्गात एकूण 370 उमेदवारांची शिफारस केली आहे. हे 370 उमेदवार तसेच राज्यसेवा परीक्षा 2021 च्या निकालांमुळे मुदतवाढ घेतलेले 10 उमेदवार तसेच शहिदांचे पाल्य 2 अशा एकूण 382 उमेदवारांची कागदपत्र तपासणी नागपूर येथील वनामती या प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आली होती.
या कागदपत्र तपासणीस 332 उमेदवार उपस्थित होते व 50 उमेदवार अनुपस्थित होते. उपस्थित असलेले 332 उमेदवारांचे अहवाल तपासून देण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पत्रव्यवहार देखील करण्यात आला. त्यानुसार 332 पैकी 269 उमेदवारांची चारित्र्य पडताळणी, वैद्यकीय तपासणी, जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी, एनसीएल प्रमाणपत्र पडताळणी, ईडब्ल्यूएस, सत्यता पडताळणी, क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी, अनाथ प्रमाणपत्र पडताळणी इ. बाबींचा अहवाल संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाला आहे.
उर्वरित 63 उमेदवारांचे अहवाल अप्राप्त आहेत. त्यामुळे प्राप्त झालेल्या उमेदवारांचे अहवाल विचारात घेऊन या परिविक्षाधीन अधिकार्यांनी वनामती प्रशिक्षण संस्था नागपूर या ठिकाणी प्रशिक्षणासाठी रुजू होण्याचे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या सहसचिव गीता कुलकर्णी यांनी परिपत्रकाद्वारे सांगितले आहे.
दरम्यान, परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती दिलेल्या उमेदवारांसाठी काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रमाचा दोन वर्षांचा कालावधी हा उमेदवारांचा परीक्षा कालावधी राहील. उमेदवाराने रुजू होताना दिलेल्या रुपये तीन लाख रकमेच्या बंधपत्रातील तरतुदी त्याच्यावर बंधनकारक असतील.
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमानुसार चारही सत्रांच्या परीक्षा दिलेल्या कालावधीत उत्तीर्ण होणे उमेदवारांना बंधनकारक राहील तसेच सर्व टप्प्यांचे प्रशिक्षणही आहे. दोन वर्षांच्या परिविक्षा कालावधीत पूर्ण करणे हे देखील उमेदवारांना बंधनकारक असणार आहे.