वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या पाच दिवसांपासून वेल्हे, राजगड, पानशेत खोर्यात पडत असलेल्या वादळी पावसाने आतापर्यंत 26 घरे जमीनदोस्त झाली. तसेच शेती व पिकांचेही नुकसान झाले आहे. महसूल विभागाने शेतीच्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. राजगड खोर्यातील पिंपरी, वाजेघर खुर्द, वाजेघर बुद्रुक, पाल बुद्रुक भागाला वादळी पावसाचा मोठा फटाका बसला आहे. याबाबत वेल्हेचे तहसीलदार शिवाजी शिंदे म्हणाले, वादळी पावसाने आतापर्यंत तालुक्यात 26 घरांचे नुकसान झाले आहे. राजगड खोर्यात वादळी पाऊस पडला. कृषी विभाग, मंडल अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांना शेती व इतर नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पश्चिम हवेली भागात गेल्या चार- पाच दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. मंगळवारी (दि. 13) सकाळपासून रिमझिम सुरू आहे. भात पिकाला पाऊस उपयुक्त आहे. मात्र, भुईमूग, कडधान्यांचे नुकसान होत आहे. बारामती लोकसभा काँग्रेसचे अध्यक्ष लहुअण्णा निवंगुणे म्हणाले, हवेली तालुक्यातील आंबी, सोनापूर परिसरात भुईमूगाचे पीक अतिपावसाने वाया गेले. त्यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे.
हवेलीचे मंडल कृषी अधिकारी शिवाजी कटके म्हणाले, पिकांच्या नुकसानाची पाहणी करण्याच्या सूचना कृषी सहाय्यकांना देण्यात आल्या आहेत.