आळंदी : आळंदी जवळच्या धानोरे फाटा भागात विषबाधा झाल्याने मेंढपाळाच्या २६ शेळ्या-मेंढ्या दगावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील कंपनीतून लगतच्या शेतात मिसळणारे केमिकल मिश्रित पाणी पिल्याने विषबाधा होऊन या शेळ्यामेंढ्या दगावल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. अद्याप विषबाधेचे नेमके कारण समजू शकलेनाही. मयत शेळ्या मेंढ्यांचे पोस्टमार्टम करून ब्लड व ऑर्गन सॅम्पल घेऊन ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्याचा अहवाल आल्यावरच मृत्यूचे खरे कारण समजू शकेल, अशी माहिती आळंदी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी मेंढपाळ संतोष मारुती ठोंबरे हे आपल्या दोनशे मेंढ्यांच्या कळपासह गुरुवारी (दि.१३) दुपारच्या सुमारास मरकळ रस्त्याने आळंदीच्या दिशेने प्रवास करत आले. या दरम्यान धानोरे फाट्यावर मेंढ्या अधिक वेळ लगतच्या शेतात चरल्या. धानोरे फाट्यावरच त्यांनी रात्रीची पाल टाकली. यादरम्यान मेंढ्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी मरकळ पशुवैद्यकीय दवाखान्यात धाव घेतली. मात्र, येथील डॉक्टरांनी मी बाहेर असल्याचे सांगितले. त्या नंतर ठोंबरे यांनी मेडिकलमधून औषधे घेत प्राथमिक उपाय केला. मात्र, रात्रीच्या सुमारास २६ मेंढ्या दगावल्या अजूनही ८ मेंढ्या अत्यवस्थ असल्याचे ठोंबरे यांनी दै. पुढारीशी बोलताना सांगितले.
मेंढ्या चरवेल्या भागात एक कंपनी आहे. या कंपनीचे केमिकल मिश्रितपाणी लगतच्या शेतात येत असते. ते प्रदूषित आहे. हेच पाणी या मेंढ्या पिल्याने त्यांचा विषबाधा होऊन मृत्यू झाला असावा. या केमिकल मिश्रित पाण्याबाबत मी अनेकदा ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदी ठिकाणी तक्रार केली आहे. मात्र, कारवाई झाली नाही.प्रदीप बवले, माजी नगरसेवक, आळंदी नगरपरिषद
दरम्यान मयत शेळ्यांमध्ये चार ते पाच बोकड आहेत. त्यांना ईदला कुर्बानीला मागत होते मात्र विकले नाहीत, असे ठोंबरे यांनी सांगितले. आता त्या बोकडांचा मृत्यू झाल्याने ठोंबरे यांचे लाखोंचे नुकसान झाले.
मृत मेंढ्यांचे ब्लड व ऑर्गन सॅम्पल फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवले आहेत. त्याचा अहवाल आल्यावरच मेंढ्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकेल. प्राथमिक अंदाजात नायट्रेट पॉयजेनिंग झाल्याचे जाणवत आहे.डॉ. वीणा कोडलकर, पशुधन विकास अधिकारी,आळंदी