दौंड: दौंड पोलिसांनी खाटीक गल्ली परिसरात छापा टाकून 40 हजार रुपये किमतीचे 250 किलो गोमांस जप्त केले. याप्रकरणी आलिम मुश्ताक शेख, नितीन उच्चप्पा गायकवाड आणि आसिफ कासम कुरेशी (सर्व रा. खाटीक गल्ली, दौंड) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक गोपाल पवार यांनी ही माहिती दिली.
पोलिसांना खाटीक गल्ली येथे गायी कापत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी एका पत्राशेडमध्ये छापा टाकून आरोपींना गायींची कत्तल करून गोमांस विक्रीसाठी नेत असताना रंगेहाथ पकडले. जप्त केलेले गोमांस पोलिसांनी नष्ट केले आहे. याप्रकरणी पोलिस जवान करमचंद बाळासाहेब बंडगर यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. (Latest Pune News)
दीड महिन्यातील तिसरी घटना
दौंड शहरातील दीड महिन्यातील ही तिसरी घटना आहे. गोहत्या थांबविण्यासाठी कठोर कारवाईची मागणी होत आहे. सततच्या गोहत्येच्या घटनांना आळा घालण्यासाठी आरोपींवर ’मोका’अंतर्गत कारवाई करणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले; अन्यथा ही परिस्थिती अशीच सुरू राहील, असे सध्याचे चित्र आहे.