पुणे

ई-पीक पाहणीत 25 लाख हेक्टरची नोंद; राज्यात औरंगाबाद विभागात सर्वाधिक ई-पीक पाहणी

अमृता चौगुले

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात खरीप हंगामातील ई-पीक पाहणी नोंदणी सुरू असून, आतापर्यंत सुमारे 25 लाख हेक्टर क्षेत्राची नोंद झाली असून, 18 लाख 80 हजार खातेदार शेतकर्‍यांनी यात सहभाग नोंदविला आहे. भूमिअभिलेख विभागाच्या वतीने खरीप हंगामासाठी राज्यातील खातेदार शेतकर्‍यांची ई-पीक पाहणी नोंदणी करण्याचे नियोजन सुरू झाले आहे. 15 ऑक्टोबरपर्यंत शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणीच्या अ‍ॅपच्या माध्यमातून ही नोंदणी करण्यास मुभा दिली आहे.

त्यानंतर मात्र शेतकर्‍याऐवजी गावकामगार तलाठी यांच्यामार्फत ही नोंदणी करण्यात येणार आहे. तलाठ्यांच्या माध्यमातून ही नोंद सुमारे एक महिनाभर राहणार आहे. त्यानुसार ई-पीक पाहणी समन्वय समितीच्या वतीने कामकाज सुरू असून, 7 ऑक्टोबर जास्तीजास्त शेतकरी खातेदारांनी ई-पीक पाहणी नोंदणीमध्ये पिकांची नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात सर्वाधिक औरंगाबाद विभागात 10 लाख 3 हजार 472 खातेदार शेतकर्‍यांनी 12 लाख 79 हजार 904 हेक्टर क्षेत्रावरील पिकांची, तर सर्वांत कमी पिकांची नोंद कोकण विभागातील शेतकर्‍यांनी केली असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. त्यानुसार 12 हजार 723 खातेदार शेतकर्‍यांनी 11 हजार 38 हेक्टर क्षेत्रावर पीक पाहणी नोंद झाली आहे.

राज्यातील जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये पिकांची नोंद करणे आवश्यक आहे. त्याचा लाभ शेतकर्‍यांनाच होणार आहे.
                                                                         – श्रीरंग तांबे
                                                               राज्य समन्वयक, ई-पीक पाहणी

अशी आहे आकडेवारी…
विभाग खातेदार क्षेत्र (हेक्टरमध्ये)
अमरावती 3, 44, 499 5,44,622
औरंगाबाद 10,03,472 12, 79,904
कोकण 12,723 11,038
नागपूर 1,02,283 1.28,902
नाशिक 2,36,572 3,24,380
पुणे 1.74,748 1,55,665
एकूण 18 74,290 24,50,515

SCROLL FOR NEXT