पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील भाजीपाला तसेच भुसार बाजारातील सेवा रस्ता व पावसाचे पाणी वाहून नेणार्या वाहिन्यांच्या मॅनहोलवरील झाकणे चोरीला जाण्याच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील काही दिवसांत बाजार आवारातून तब्बल 25 झाकणे चोरट्यांनी चोरून नेली आहेत. भुरट्या चोरांनी प्रशासनाला हैराण केले असून, चोरीला आळा घालण्यासाठी मॅनहोलवर फायबरचे झाकण बसविण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला आहे. (Pune News Update)
गुलटेकडी मार्केट यार्ड परिसरातील भुरट्या चोरांना, गर्दुल्ले यांना चोरी करायला काही मिळत नसल्याने ते आता बाजार समितीच्या सेवा रस्ता व पावसाळी वाहिन्यांवर ठेवण्यात आलेल्या लोखंडी अवजड झाकणांची ते सर्रासपणे चोरी करीत आहेत. एका लोखंडी वजनदार झाकणाची किंमत 12 हजार रुपये असून, आतापर्यंत 25 झाकणे चोरीला गेली आहेत. त्यामुळे आतापर्यंत किमान 3 लाख रुपयांपेक्षाही जास्त किंमतीच्या लोखंडी झाकणांची चोरी झाली आहे. या चोरून आणलेल्या लोखंडी झाकणांची चोरांना भंगारात विक्री केल्याने चांगली किंमत मिळत असल्याने या प्रकारांमध्ये वाढ झाली आहे.
सेवा रस्ता व पावसाळी वाहिन्यांवरील मॅनहोलवर झाकण नसल्याचे आढळताच नवीन झाकण लावण्याची कार्यवाही प्रशासनाकडून त्वरित करण्यात आली. मात्र, झाकण वारंवार गायब होत असल्याने हा चोरीचा प्रकार असल्याचे लक्षात आले. चोरी टाळण्यासाठी दर्जेदार फायबरचे झाकण बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत, संबंधित विभागाला सूचना करण्यात आली आहे. भुसार बाजारातील चोरीला गेलेल्या झाकणांच्या ठिकाणी फायबरचे झाकण बसविण्यात येईल. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे त्याठिकाणची झाकणे सुरक्षित आहेत.डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती.
बाजार आवारात राज्यासह परराज्यांतून मोठमोठी वाहने तसेच खरेदीदार येत असतात. मॅनहोल उघडे राहिल्यामुळे त्या मॅनहोलमध्ये एखादी व्यक्ती पडून अथवा धावत्या वाहनांचे चाक अडकून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मॅनहोलवर झाकण नसल्याचे आढळताच नवीन झाकण लावण्याची कार्यवाही प्रशासनाकडून त्वरित करण्यात आली. मात्र, झाकण वारंवार गायब होत असल्याने हा चोरीचा प्रकार असल्याचे व्यापार्यांच्या लक्षात आले. छुप्या पद्धतीने होत असलेल्या झाकणांच्या चोरीमुळे प्रशासनही हतबल झाले होते. बाजार आवारातील भुरट्या चोरीला आळा घालण्यासाठी अखेर प्रशासनाने फायबरची मजबूत झाकणे बसविण्याचा निर्णय घेतला.