पुणे : पुढारी वृत्तसेवा : अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पहिली फेरी 21 ते 24 जूनदरम्यान राबविण्यात आली. यामध्ये कॅपमधून 20 हजार 855, तर कोटा प्रवेशातून 3 हजार 814 अशा एकूण 24 हजार 669 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. पहिल्या फेरीत 42 हजार 239 विद्यार्थ्यांना प्रवेश जाहीर झाला असून, 23 हजार 351 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय जाहीर झाले होते. आता सोमवारपासून दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात अकरावी प्रवेशाठी 324 महाविद्यालयांत 88 हजार 445 कॅपच्या तसेच 24 हजार 945 कोटा प्रवेशाच्या अशा एकूण 1 लाख 13 हजार 390 जागा उपलब्ध आहेत.
त्यापैकी कोटा आणि कॅप मिळून 24 हजार 669 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर प्रवेशासाठी 88 हजार 721 जागा उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीच्या निवड यादीत पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेचे 2 हजार 476, वाणिज्य शाखेचे 8 हजार 500, विज्ञान शाखेचे 11 हजार 953, व्यावसायिक अभ्यासक्रमाचे 422 विद्यार्थी आहेत. शाखानिहाय नेमके किती प्रवेश झाले, याची आकडेवारी उपसंचालक कार्यालयातून सोमवारी देण्यात येईल. त्यानंतरच नेमके किती प्रवेश झाले आणि पहिल्या पसंतीचे कॉलेज मिळूनही किती विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला, हे समजणार आहे.