वडगाव शेरी मतदारसंघ
वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवसापर्यंत 24 उमेदवारांनी 34 अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये पिता-पुत्रासह एका महिला उमेदवाराच्या अर्जाचा समावेश आहे. नामांकन कक्षात शिस्तबद्ध वातावरणात निवडणूक निर्णय अधिकारी सचिन बारवकर यांच्याकडे अर्ज सादर करण्यात आले आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरदरम्यान नामांकन कक्षातून 56 उमेदवारांनी तब्बल 112 अर्ज नेले. त्यापैकी 24 उमेदवारांनी 34 अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, बहुजन समाज पार्टी, हिंदू समाज पार्टी, सैनिक समाज पार्टी, भारतीय नवजवान सेना पक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडी, विकास इंडिया पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए), भारतीय जवान किसान पार्टी यांसह अपक्ष उमेदवारांनी अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे सादर केला.
यामध्ये बहुतांश उमेदवारांनी दोन तसेच तीन अर्ज सादर केले आहेत. वडगाव शेरी मतदारसंघात येणार्या निवडणुकीत तगडा लढा अपेक्षित आहे, असे निरीक्षकांचे मत आहे.
खडकवासला मतदारसंघ
खडकवासला विधानसभा मतदारसंघात शेवटच्या दिवसापर्यंत 28 उमेदवारांनी 39 अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये केवळ एका महिला उमेदवाराच्या अर्जाचा समावेश आहे. नामांकन कक्षात शिस्तबद्ध वातावरणात अर्ज स्वीकारण्यात आले आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. मंगळवारी नामांकन प्रक्रियेचा शेवटचा दिवस होता.
निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किरण सुरवसे आणि नोडल अधिकारी अभिषेक धुमाळ यांच्या नेतृत्त्वात नामांकन कक्षात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. सहाय्यक महसूल अधिकारी चंद्रशेखर मते, वैभव मोटे आणि रविकांत बडे यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक उमेदवारांनी अखेरच्या क्षणी आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी अर्ज दाखल केले.
निवडणूक अधिकारी आणि सहाय्यक अधिकार्यांनी प्रत्येक अर्जाची तपासणी करून, नियमानुसार सर्व प्रक्रिया पार पाडल्या आहेत. खडकवासला मतदारसंघात येणार्या निवडणुकीत तगडा लढा अपेक्षित आहे, असे निरीक्षकांचे मत आहे. नामांकन प्रक्रियेचा हा अंतिम टप्पा पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची यादी तयार होईल. येत्या 4 नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
हडपसर मतदारसंघ
हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये तब्बल 30 नामनिर्देशन अर्ज दाखल झाले असून, 24 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उभे आहेत. दि. 4 नोव्हेंबरपर्यंत माघारीचा दिवस असून, त्यानंतरच किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहतात, हे पाहता येणार आहे.
या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार चेतन तुपे, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार साईनाथ बाबर या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांबरोबरच संभाजी ब्रिगेडचे शिवाजी पवार, राष्ट्रीय समाज पक्षाचे मनोज माने, आरपीआयचे कृष्णा कदम, अखिल भारतीय एकता पार्टीचे उस्मान शेख, प्रहार जनशक्ती पक्षाचे जुबेर मेमन, वंचित बहुजन आघाडीचे अफरोज मुल्ला यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
या मतदारसंघामध्ये उबाठा शिवसेनेकडून बंडखोरी करत गंगाधर बधे, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे बंडखोर समीर तुपे आणि उल्हास तुपे यांनी, तर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आनंद आलकुंटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत. या मतदारसंघामध्ये एकूण 51 अर्ज प्राप्त झाले असून, 24 उमेदवार रिंगणात आहेत.