पुणे : निगडी परिसरात शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्याची कामगिरी रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक संचालक नेहा पंचमिया व नचिकेत उत्पात यांनी केली असून, गेल्या सहा वर्षांत मानवी वस्तीत शिरलेल्या तब्बल 223 बिबट्यांना पकडून पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्याचे काम त्यांनी केले आहे.
इंग्लडमधून मास्टर्स डिग्री घेऊन परतलेल्या नेहा या प्राण्यांबद्दलच्या प्रेमापोटी गेल्या 19 वर्षांपासून रेस्क्यु चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था चालवित आहेत. रस्त्यावरील भटकी कुत्री आणि अन्य प्राण्यांच्या पुनर्वसनापासून त्यांनी या कामाला सुरुवात केली. गेल्या सहा वर्षांपासून वन विभागाच्या रेस्क्यु ऑपरेशनमध्ये त्या सहभागी होत आहेत. शहराच्या परिसरात आढळणारे बिबटे हे दूरवरच्या जंगलातून आलेले नसून, ते जवळपासच्या डोंगरावरूनच येतात. रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा माग घेत ते शहरात शिरतात आणि शिकार करून दिवस उजाडण्यापूर्वीच अधिवासात परततात.
निगडीत आलेल्या बिबट्याला शिकार मिळण्यास उशीर झाला, म्हणूनच तो लोकांच्या नजरेत आला. साधारणतः बिबटे हे माणसांना घाबरतात, असा अनुभव आहे. आज पकडलेला नर जातीचा बिबटाही भिंतीकडे तोंड लपवून चालत असताना आढळून आला. पूर्ण वाढ झालेल्या या बिबट्याचे वय व वजन विचारात घेऊनच डॉ. कल्याणी ठाकूर यांनी त्याच्यावर दोन डार्ट मारले आणि त्याला दीड तासात जेरबंद करण्यात आले, असेही त्यांनी सांगितले.