पुणे

फ्लॅट भाडेतत्त्वावर घेण्याच्या बहाण्याने 21 लाखांचा गंडा

अमृता चौगुले

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लष्करी आधिकारी असून, परिवारासह राहायचे असल्याने सदनिका भाडेतत्त्वावर पाहिजे असल्याचा बहाणा करून सायबर चोरट्यांनी कंपनीत पर्चेस मॅनेजर असलेल्या घरमालकाला तब्बल 20 लाख 83 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कर्वेनगर येथे राहणार्‍या एका 46 वर्षांच्या नागरिकाने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी स्वप्नील विकासचंद्र गाडे हे आकुर्डी येथील एका कंपनीमध्ये पर्चेस मॅनेजर म्हणून काम करतात. त्यांच्या भावाची वडगाव येथील सदनिका भाडेतत्त्वावर द्यायची होती. त्यासाठी त्यांनी वेबसाईटवर जाहिरात टाकली होती. त्यालाच अनुसरून त्यांना दीपक पवार असे नाव सांगणार्‍याने फोन केला. आपण लष्करात असून, खडकी येथे बदली झाली आहे. त्यासाठी सदनिका भाडेतत्त्वावर घ्यायची असल्याचे सांगितले. त्यांनी फ्लॅटचे भाडे 18 हजार, डिपॉझिट 60 हजार रुपये व दरमहा मेंटेनन्स 1500 रुपये तसेच पाणी व गॅसचे पैसे द्यावे लागतील, असे सांगितले.

ती सदनिका भाड्याने घेण्यास तयार झाला. त्याने मिलिटरी कॅन्टीन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच पासपोर्ट साईज फोटो फिर्यादीला पाठवला. भाडेकरार करण्यासाठी त्यांना पैसे भरण्यास फिर्यादीने सांगितल्यावर लष्कराचे अ‍ॅडमिन डिपार्टमेंट पैसे भरणार असून, त्यांचा फोन येईल, असे सांगितले. त्यानंतर काही वेळाने त्यांना लष्कराच्या अ‍ॅडमिनिस्ट्रेशन विभागामधून अनिकेत काळभोर बोलत असल्याचे सांगून बजरंग पवार यांना सदनिका भाड्याने द्यायची असल्याने त्याची मिलिटरी अ‍ॅडमिनिस्ट्रेशन विभागामध्ये नोंद करायची असल्याने सुरुवातीला फिर्यादींना काही रक्कम पाठवावी लागेल, असे सांगितले.

त्यानुसार त्यांच्याकडे अगोदर डिपॉझिटचे 60 हजार रुपये पाठवण्यास सांगितले. त्यांनी पैसे पाठवल्यानंतरही ते पैसे मिळाले नसल्याचे सांगितले. आणखी 39 हजार 995 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यांनी मी का पैसे पाठवायचे असे विचारले असता, त्याने त्यांच्या सिस्टिममध्ये एक ट्रान्झेक्शन कोड येतो, तो आल्याशिवाय त्यांना फिर्यादी यांनी पाठवलेले पैसे त्यांना परत पाठवता येणार नसल्याचे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी आणखी 39 हजार 995 रुपये पाठवले. ते पैसेही मिळाले नसल्याचे सांगितले.
त्यानंतर त्याने इंटरनेट बँकिंग व अन्य मोबाईल अ‍ॅप्लिकेशनद्वारे पैसे पाठवण्यास सांगितले. प्रत्येकवेळी तो पैसे मिळाले नसल्याचे सांगून वेगवेगळ्या खात्यावर त्यांना पैसे पाठवण्यास व सर्व पैसे परत करणार असल्याचे सांगत होता.

अशा प्रकारे त्यांनी एकूण 20 लाख 83 हजार 787 रुपये पाठवले. त्यानंतर त्यांच्या खात्यात 14 लाख 33 हजार 807 रुपये ट्रान्सफर केल्याचा स्क्रीन शॉट व्हॉट्सअपवर त्याने पाठवला. प्रत्यक्षात कोणतेही पैसे जमा झाले नव्हते. त्यानंतर त्याने लवकरच पैसे जमा होतील, असे सांगून 9 लाख 11 हजार 975 रुपये ट्रान्सफर केल्याचा स्क्रीनशॉट पाठवला. प्रत्यक्षात त्यांच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा झाली नव्हती. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सप्टेंबर महिन्यात सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT