पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्र शासनाच्या आदेशानुसार आता पुणे जिल्ह्यातील राज्य सरकारी कार्यालयांमधील तब्बल 2 हजार 47 वाहने स्क्रॅप होणार आहेत. त्यासाठी सरकारी कार्यालयांमधील अधिकार्यांना आपल्याकडील 15 वर्षे होऊन आयुर्मान संपलेल्या वाहनांची माहिती गुगल शीटद्वारे भरून प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे जमा करावी लागणार आहे.
आयुर्मान संपलेल्या सरकारी वाहनांची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे आल्यानंतर परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक त्या-त्या विभागात जाऊन वाहनांची तपासणी करणार आहेत. त्यानंतरच ती वाहने स्क्रॅप करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात येणार आहे. परिवहन विभागाने पुण्यातील सर्व राज्य सरकारी कार्यालयांना याबाबतची सविस्तर माहिती आरटीओला कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील निष्कासनास पात्र शासकीय वाहनांची एकूण संख्या 2 हजार 694 इतकी आहे.
राज्यातील वाहनांचे प्रदूषण कमी करणे, कार्यक्षमता सुधारणे तसेच जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणणे व त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये गुणात्मक सुधारणा होण्यासाठी केंद्र शासनाने मोटार वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम, 2021 प्रसिद्ध केले असून, त्याची अंमलबजावणी करण्याची बाब परिवहन विभागाकडे सोपविण्यात आलेली आहे, त्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ही कार्यवाही सुरू आहे.
महापालिकेची 395 वाहने जाणार भंगारात
केंद्र सरकारच्या निर्णयानुसार 15 वर्षांचे आयुर्मान संपलेली 395 वाहने 31 मार्चनंतर भंगारात जाणार आहेत. ही वाहने सेवेतून गेल्यानंतर महापालिकेला तातडीने 260 वाहनांची गरज लागणार आहे. त्यामुळे यापैकी काही वाहनांची खरेदी तर काही वाहने भाडेतत्त्वावर घेतली जाणार आहेत.
महापालिकेकडे अधिकारी आणि पदाधिकार्यांसाठी आणि विविध विभागाच्या कामांसाठी 1470 लहान मोठी वाहने कार्यरत आहेत. यामध्ये 1280 वाहने ही महापालिकेने खरेदी केलेली आहेत, तर 190 वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात आलेली आहेत. नव्या वाहनांचे नियोजन महापालिकेच्या वाहन विभागाने केले असून काही वाहने खरेदी व काही वाहने भाडे तत्त्वावर घेण्यात येणार असल्याचे वाहन विभागाचे प्रमुख डॉ. महेश डोईफोडे यांनी सांगितले.
एमटीएससी करणार वाहनांचा लिलाव…
शहरातील सर्व सरकारी कार्यालयांनी 'मेटल ट्रेड स्क्रॅप कॉर्पोरेशन लि.' यांच्या संकेतस्थळावर गुगल शीटच्या माध्यमातून आयुर्मान संपलेल्या वाहनांची माहिती अपलोड करावी. या गाड्यांच्या स्क्रॅपची आणि लिलावाची प्रक्रिया एमटीएससीमार्फत होणार आहे.