Pune Crime News :
ओतूर : जाधववाडी, बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) येथे ओतूर वन विभागाने सापळा रचून २०१ किलो चंदनाची लाकडे व कार असा एकूण १५ लाख १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई मंगळवारी (दि. ६) रात्री ८ च्या सुमारास करण्यात आली. घटनास्थळाहून कारचालक पसार झाला. त्याच्याविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहू सोमनाथ धुळे (रा. जाधववाडी, बोरी बुद्रुक, ता. जुन्नर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चंदनाच्या लाकडांची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती ओतूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार छापा मारला असता, लहू धुळे हा त्याच्या ताब्यातील कारमधून चंदनाच्या लाकडांची अवैध वाहतूक करत असल्याचे दिसून आले. कार ताब्यात घेत तपासणी करत असताना लहू हा अंधाराचा फायदा घेत तिथून पळून गेला. कारमध्ये चंदनाची लाकडे, डिजिटल वजन काटा, गलोल, मोबाईल आढळून आला. कारसह अधिकाऱ्यांनी एकूण १५ लाख १५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर विभागाचे सहायक वनसंरक्षक अमृत शिंदे, ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी लहू विठ्ठल ठोकळ यांच्यासह वनपाल, वनरक्षक, आळेफाटा पोलिस यांच्या पथकाने केली.